महिला आयोग

महिला आयोग

१४३७३

अवैध गर्भपात, बालविवाह रोखण्याचे मोठे आव्हान
---
रूपाली चाकणकर; ६३२ महिला, ३३२ मुली बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत आहेत. अवैध गर्भपातांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे, बालविवाह रोखण्याच्या आव्हानासह अवैध सोनोग्राफी किंवा गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, यासाठी उद्या (ता. ७)पासून छापा सत्र सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज येथे सांगितले.
‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जनसुनावणी झाली. त्यात ९१ तक्रारी आल्या. त्या आढाव्यानंतर त्या म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात ७४ बालविवाह उघडकीस आले. ५५ बालविवाह रोखले. १९ गुन्हे नोंद आहे. जिल्ह्यात २०२२ पासून आतापर्यंत दोन हजार ४७८ महिला बेपत्ता होत्या. पैकी एक हजार ८४६ सापडल्या, उर्वरित बेपत्ता आहेत. त्याचवेळी बेपत्ता ३३२ मुलींचाही शोध सुरू आहे.’’
त्या म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात गर्भलिंग तपासणी, अवैध गर्भपाताची प्रकरणे उघडकीस आली. अशी दहा प्रकरणे आहेत. त्यापैकी सहा गुन्ह्यांचा निकाल लागला. सरकारी दवाखान्यातून गर्भपाताचे प्रकार होतात का, याचे धागेदोरे तपासले पाहिजेत. समाजमंदिर किंवा सांस्कृतिक सभागृहात बालविवाह होत आहेत. ते रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कार्यालयांवर कारवाई करावी. बेपत्ता महिला आणि मुलींचा शोध घेण्यासंदर्भात तक्रार तत्काळ घ्यावी. पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर थेट महिला आयोगाशी संपर्क साधावा.’’ शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध लढा देण्यासाठी असणारी अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी) तत्काळ नियुक्त व्हावी. अशी समिती नसलेल्या कंपनीला ५० हजारांचा दंड करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ‘‘अवैध सोनोग्राफीचे १० खटले न्यायालयात आहेत. गेल्या महिन्यात गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताची मोठी प्रकरणे समोर आली. ग्रामीण भागात खूप मोठे रॅकेट आहे. त्याची एक साखळी आहे. त्याबद्दल आमच्याकडे माहिती येत आहे. या वेळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील, अतिरिक्त अधीक्षक जयश्री देसाई, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील उपस्थित होते.

प्रेम, नोकरीच्या आमिषाने फसवणूक
नोकरी आणि प्रेमाचे आमिष दाखवून मुलींवर अत्याचार केले जात आहेत. आखाती देशातही याच माध्यमातून मुलींची फसवणूक होते. आखाती देशात ज्या महिला आणि मुली आहेत, त्यांची सुटका झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.

कोल्हापूरचे कौतुक
जिल्ह्यातील अनेक गावांनी विधवा प्रथा बंद केली. त्यामुळे महिलांना त्यांच्या अधिकाराने, सन्मानाने जगता येत आहे. त्याबद्दल चाकणकर यांनी कौतुक केले.

जिल्ह्याचा आढावा
- बलात्काराचे ५० पैकी ४९ गुन्हे सिद्घ
- विनयभंगाच्या २८२ तक्रारी
- हुंडाबळीच्या दोन गुन्ह्या़ंत दोघांवर कारवाई
- २०२२ मध्ये ३३२ मुली; त्यांचा शोध सुरू
- अनैतिक व्यवसायाचे १२ गुन्हे; २४ आरोपी ताब्यात घेऊन १९ महिलांची सुटका

महिलांनो पुढे या!
मुरगूडमधील एका डॉक्टरचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्याच्यावर कारवाईसाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पुरेशी माहिती मिळत नाही. त्यामुळे महिलांनी माहिती देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com