... अखेर जयसिंगपूरमध्ये स्वच्छता

... अखेर जयसिंगपूरमध्ये स्वच्छता

Published on

14780
जयसिंगपूर : शहरातील कचऱ्याप्रश्‍नी वृत्त प्रसिध्द होताच स्वच्छतेला वेग आला.

...अखेर जयसिंगपूरमध्ये स्वच्छता
कचरा उठाव होता ठप्प; कोंडाळ्यांनी घेतला मोकळा श्‍वास
जयसिंगपूर, ता. ८ : शहरात डेंगीचे रुग्ण आढळत असताना, कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिध्द झाले होते. याची दखल घेऊन पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून, शनिवारी शहरातील कोंडाळ्यांच्या ठिकाणांनी मोकळा श्‍वास घेतला. आता यामध्ये सातत्य राहणार का? असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे.
कोंडाळीमुक्त शहराच्यादृष्टीने पालिकेने प्रयत्न केले असले तरी, कचऱ्याने मात्र अद्याप आपली जागा सोडली नसल्याचे शहरातील कोंडाळी पाहून लक्षात येते. प्रमुख मार्गावरील फायबरच्या कचरा कुंड्यांची अवस्थाही खराब आहे. काही ठिकाणी कोंडाळी भरून कचरा रस्त्यावर विखुरला जात आहे. हाच कचरा गटारीमध्ये जात असल्याने गटारी तुंबण्याचे प्रकार नित्याचे बनले आहेत. शहरातील शिरोळ रोडवर अकराव्या, बाराव्या गल्लीच्या प्रमुख मार्गावर तुंबलेल्या गटारीचे पाणी वाहत असते. किमान चार चार तास हे पाणी वाहत असते, तरी याकडे कोणाचे लक्ष नसते.
शहरातील अनेक भागांत साचलेला कचरा आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेचे ठळक उदाहरण मानले जात आहे. एक वेळ तक्रार करून कचरा उठाव केला जात असला तरी, प्रत्येकवेळी सांगिल्यानंतरच कचरा उठाव केला जात असल्याने नागरिकांनीही याकडे बघ्याची भूमिका घेतल्याने हा कचरा आता अनेक दिवस हलवला जात नव्हता. शिवाय कचरा टाकणाऱ्या नागरिकांमध्येही प्रबोधन केले नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या रोगांचा धोका असल्याने पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------
चौकट
जागरूक शाहूनगरकर...
शहरातील शाहूनगरमधील नागरिकांनी नागरी समस्यांप्रश्‍नी प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ‘आम्ही शाहूनगरकर’ या नावाचा व्हॉटस्-अॅप ग्रुप सुरू केला आहे. यामध्ये भागातील नागरिक, माजी नगरसेवक, पालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोणत्याही भागात कचरा, पाणी पुरवठा अथवा अन्य कोणताही प्रश्‍न असेल, तर थेट या ग्रुपवर फोटोसह प्रश्‍न उपस्थित केले जातात. यानंतर ग्रुपवर प्रशासनावर अक्षरश: टीकेची झोड उठल्यानंतर तातडीने प्रश्‍न मार्गी लावले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.