हवामान स्थिती

हवामान स्थिती

येत्या आठवड्यात जेमतेमच पाऊस
अलनिनोचा परिणामः

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १० : येत्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाची स्थिती फारशी समाधानकारक असणार नाही. जोरदार पावसाची शक्यता नसली तरी जिल्ह्यातील तालुक्यांत जेमतेम पाऊस पडेल, असे चित्र आहे. अलनिनोच्या परिणामामुळे हातकणंगले, शिरोळ व कागलच्या काही भागात टंचाईसदृश्‍य स्थिती राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात १ जून ते ८ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस झाला. चार-पाच महिन्यांपूर्वी अलनिनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता वर्तवली जात होती. त्यात ९६ टक्के पाऊस पडेल, असे सांगण्यात आले होते. जूनमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तळकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व चंदगड तालुक्यातील काही भागांत तो सक्रिय झाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची सक्रियता राहिली नाही. नैऋत्य मोसमी वारे विस्कळीत झाले. त्याचा प्रभाव बारा ते पंधरा दिवस राहिला. त्यानंतर मान्सून पूर्ववत व्हायला आठ दिवसाचा अवधी लागला. परिणामी २३ जूननंतर पावसाला सुरवात झाली. मात्र, सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.
येत्या आठवड्यात शिरोळ तालुक्यामध्ये २५ ते ३०, हातकणंगले २८ ते ३२, शाहूवाडी ७५ ते ८०, करवीर ३५ ते ४०, गगनबावडा ६० ते ७०, राधानगरी ७५ ते ८०, कागल ३५ ते ४०, चंदगड ९५ ते १००, भुदरगड ६५ ते ७०, आजरा ५५ ते६० व गडहिंग्लज तालुक्यात ३५ ते ४० मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे जिरायती पिकांवर परिणाम होईल, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर तो वायव्य दिशेकडे सरकला तर समाधानकारक पाऊस पडेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
------------------
कोट -
‘यंदाच्या मान्सूनवर अलनिनोचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. जून व जुलैपेक्षा ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये त्याची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईसदृश्‍य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने प्रशासन व नागरिकांनी तयारी करायला हवी.
- राहुल पाटील, मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com