प्रस्तावांच्या व्हेरिफिकेशनची माहिती एसएमएसद्वारे

प्रस्तावांच्या व्हेरिफिकेशनची माहिती एसएमएसद्वारे

Published on

विविध खेळांचा लोगो

प्रमाणपत्र ‘व्हेरिफिकेशन’ची माहिती ऑनलाईन
एसएमएस, ई-मेल मिळणार; कोल्हापूर विभाग राज्यात टॉप, पाच हजार क्रीडा प्रस्तावांचे होणार डॉक्युमेंटेशन
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : पाच टक्के नोकरीसाठी खेळाडूंकडून करण्यात येणाऱ्या क्रीडा प्रमाणपत्रांच्या व्हेरिफिकेशनची माहिती एसएमएस व ई-मेलद्वारे दिली जाणार आहे. क्रीडा संचालनालयाच्या कोल्हापूर विभागाकडून राज्यात प्रथमच त्याची सुरवात होत आहे. दरम्यान, खेळाडूंच्या प्रमाणपत्रांचे व्हेरिफिकेशन करण्यात कोल्हापूर विभाग राज्यात ‘टॉप’ ठरला आहे. विभागात जुलै २०१६ पासून आलेल्या सुमारे पाच हजार प्रस्तावांचे डॉक्युमेंटेशनही केले जाणार आहे.
संचालनालयाने व्हेरिफिकेशनची माहिती ऑनलाईन खेळाडूंना पाठविण्यासाठी वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर खेळाडूने प्रमाणपत्राच्या व्हेरिफिकेशनसाठी प्रस्ताव कधी पाठवला, तो व्हॅलीड की, इनव्हॅलीड आहे याची माहिती असणार आहे. त्याचा एसएमएस व ई-मेल त्यांना पाठवला जाणार असून, वेबसाईटवर तो प्रस्ताव अपलोड केला जाणार आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. महिन्याकाठी किमान शंभर प्रस्ताव व्हेरिफिकेशनसाठी येत असून, ते ऑलिम्पिक, आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत खेळल्या जाणाऱ्या ४९ क्रीडा प्रकारांशी संबंधित आहेत.
प्रमाणपत्रांचे व्हेरिफिकेशन करण्यात कोल्हापूर विभाग राज्यात भारी ठरला आहे. त्यानंतर पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती व मुंबईचा क्रमांक लागतो. विभागातील पाच जिल्ह्यांतील खेळाडूंचा क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा आकडा मोठा असल्याचा तो परिणाम आहे. विभागाकडे आजपर्यंत आलेल्या पाच हजार प्रस्तावांची माहिती खेळाडूंना मिळावी, यासाठी त्यांचे डॉक्युमेंटेशनचे काम सुरू होत आहे. प्रस्तावांचे स्कॅनिंग केले जाणार असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, कराटेबाबत क्रीडाधिकारी शंकर भास्कर म्हणाले, ‘‘कराटे क्रीडा प्रकाराला मान्यता असली तरी संघटनांच्या संलग्नतेला नाही. संघटनांकडून व्हेरिफिकेशनसाठी प्रस्ताव आले, तर ते इनव्हॅलीड केले जातात. शालेय स्तरावरील प्रस्तावांचे व्हेरिफिकेशन केले जाते.’’
-------------
चौकट
शालेय स्तरावरील ४९ क्रीडा प्रकार असे-
धनुर्विद्या, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, ज्यूदो, व्हॉलीबॉल, लॉन-टेनिस, रायफल शूटिंग, टेबल-टेनिस, तायक्वाँदो, कबड्डी, जलतरण, कुस्ती, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्क्वॅश, वुशू, नेहरू हॉकी, सुब्रतो फुटबॉल, रग्बी, सेपेकटकरा, मॉडर्न पेंटॅथ्लॉन, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, खो-खो, बॉल बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, थ्रोबॉल, रोल स्केटिंग-हॉकी, योगासन, किक-बॉक्सिंग, सिकई, रोलबॉल, डॉजबॉल, शूटिंग बॉल, टेनिक्वाईट, आट्या-पाट्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.