मोटार चोरीस - २४ तासात तपास

मोटार चोरीस - २४ तासात तपास

Published on

15305
...

मोटारीच्या सुट्याभागासाठी मोटारच चोरली

चोरीसाठी वापरली क्रेन ः कदमवाडीतील प्रकार, एकास अटक

कोल्हापूर, ता. १० ः उंची किमतीच्या मोटारीच्या इंजिनचा एक सुटा भाग मिळविण्यासाठी पन्हाळ्यातील तरुणाने कदमवाडीतील मोटार चोरली. शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासांत चोरट्याला अटक केली. नामदेव सर्जेराव महाडिक (वय ३०, रा. महाडिकवाडी, पोस्ट कसबा ठाणे, ता. पन्हाळा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तसेच भाड्याने क्रेन मागवून कदमवाडीतून ही मोटार लंपास केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी चोरीस गेलेली मोटार आणि त्यासाठी वापरलेली सुमारे साडेतीन लाखांची क्रेनही जप्त केली.

पोलिसांनी सांगितले की, कदमवाडीतील विठ्ठल मंदिर चौक परिसरात राजेशकुमार संपतराव तोंडे-पाटील राहतात. त्यांची मोटार कदमवाडी परिसरातून ७ जुलैला चोरी झाली. त्याची फिर्याद त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार संदीप जाधव यांच्या पथकाने घटनास्थळावर चौकशी केली. तेव्हा दोन व्यक्तींनी क्रेन आणून ती मोटार नेल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी क्रेनच्या नावावरून त्या मालकाचा शोध घेतला. त्यानंतर संशयित नामदेव महाडिक याला मित्राच्या मोटारीला एक सुटा भाग पाहिजे होता. तो मिळविण्यासाठी ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीतील मोटार आणि चोरीसाठी वापरलेली क्रेन जप्त केली. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---

दीड हजार भाड्यासाठी, साडेतीन लाखांची क्रेन जप्त...

मोटार नादुस्त असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून फिर्यादींनी ती कदमवाडी येथे उभी केली होती. या मोटारीला कोणी वाली नसल्याचे पाहून संशयित महाडिक याने सुट्या भागासाठी ती चोरली. मोटार नागाळा पार्कपर्यंत नेण्यासाठी त्याने क्रेन चालकास दीड हजार रुपये भाडे दिले. सुटा भाग मिळाल्यानंतर पुन्हा ती मोटार तेथेच नेण्याचे त्याचे नियोजन होते, मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे दीड हजारांच्या भाड्यासाठी लाखो रुपयांची क्रेन जप्त झाल्याची माहिती अजयकुमार सिंदकर यांनी पत्रकारांना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.