राज्यातील ऐतिहासिक १३ गावांतील शाळांचा होणार

राज्यातील ऐतिहासिक १३ गावांतील शाळांचा होणार

कागलच्या घाटगे विद्यामंदिराला
एक कोटी ११ लाखांचा निधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे निमित्त; ऐतिहासिक शाळांचा विकास
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील महापुरुषांशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक १३ गावांमधील शाळांचा विकास केला जाणार आहे. याअंतर्गत कागलमधील हिंदुराव घाटगे विद्यामंदिराच्या विकासासाठी एक कोटी ११ लाख ८६ हजार ५४५ रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), महर्षी धोंडो केशव कर्वे, साने गुरूजी, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख या महापुरुषांशी संबंधित असणाऱ्या ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसित करण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. त्यासाठी केंद्र शासनाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागास १४ कोटी ३० लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या खर्चाच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
------------------
चौकट
अन्य शाळा अशा-
उच्च प्राथमिक शाळा चोंडी (अहमदनगर), जिल्हा परिषद शाळा (मुलींची) मोझरी, प्राथमिक शाळा शेंडगांव, प्राथमिक शाळा पापळ (अमरावती), शाळा क्रमांक एक पिंपळगाव-बसवंत (नाशिक), ज्योती सावित्री इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळा, खानवडी (पुणे), प्राथमिक (मराठी) शाळा, मुरूड, प्राथमिक शाळा, पालगड (रत्नागिरी), उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक वाटेगांव, उच्च प्राथमिक शाळा, येडेमच्छिंद्र (सांगली), प्रतापसिंह हायस्कूल, केंद्रीय प्राथमिक शाळा, नायगांव (सातारा) या शाळांचा विकास केला जाणार आहे.
-----------
कागलची शाळा १३६ वर्षांपूर्वीची
कागलच्या नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ संचालित हिंदुराव घाटगे विद्यामंदिर या शाळेची सुरूवात २१ मार्च १८८७ मध्ये झाली. शिक्षण सेवा आणि त्याग हे ब्रीद घेऊन गेल्या १३६ वर्षांपासून या शाळेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com