दोन हजार पाणीसाठ्यांची तपासणी

दोन हजार पाणीसाठ्यांची तपासणी

Published on

दोन हजार पाणीसाठ्यांची तपासणी
गडहिंग्लज शहर : पालिकेतर्फे डेंगी, चिकनगुनिया प्रतिबंधात्मक सर्वेक्षण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : शहरात डेंगी व चिकन गुनिया ताप सदृश्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात तपासलेल्या १९८१ पाणी साठ्यापैकी १३ साठे दुषित आढळले आहेत. किटकजन्य रोगांच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी केले आहे.
गतवर्षी शहरात डेंगी व चिकन गुनिया सदृश्य आजाराचे असंख्य रुग्ण आढळले होते. या पार्श्‍वभूमीवर यंदा अशी साथ येण्यापूर्वीच पालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १ जुलैपासून घर टू घर सर्वेक्षण हाती घेतले. त्यासाठी पाच कर्मचाऱ्‍यांचे पथक नियुक्त करुन त्याद्वारे प्रत्येक घरातील पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. ११ जुलैअखेर शहरातील नदीवेस, मेवेकर गल्ली, शिवाजी चौक परिसर, सुतार व डोमणे गल्ली, माळी गल्ली, यशवंत पाटील घर बोळ, माळी गल्ली, कुंभार गल्ली, भाट बोळ, रिंग रोड परिसर आदी भागात डेंगी, चिकनगुनिया सदृश्य तापाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणात विशेष करुन पाणी साठवण्यात येणाऱ्‍या बॅरल, हौद, बांधीव टाकी, टायरी, फुटक्या बाटल्या, प्लास्टिक, डबे आदींची तपासणी केली. त्यात १३ दुषित पाणीसाठे आढळले. अशा कुटूंबातील नागरिकांचे प्रबोधन करुन या आजाराची साथ पसरवणार्‍या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये होत असल्याने आठवड्यातून एक दिवस पाणीसाठे रिकामे करुन त्याची स्वच्छता व कोरडे करुन घेण्याचे आवाहन केले. या सर्वेक्षणात पाणीसाठा असलेल्या व बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मलेरिया ऑईल टाकले. सर्व ठिकाणी औषध व धूर फवारणीही केली आहे. शहरात साथरोग उद्‍भवू नये म्हणून घंटागाडीच्या माध्यमातून ऑडीओ क्लीपद्वारे व हस्त पत्रिकातून प्रबोधन करण्यात येत आहे. साथ रोगांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास साथीचा उद्रेक होणार नाही. यासाठी नागरिकांनी यामध्ये सहभाग द्यावा असे आवाहनही श्री. खारगे यांनी केले आहे.
-----------
तापाचे १० रुग्ण
दरम्यान, या दहा दिवसाच्या सर्वेक्षणात पथकाकडून ६४० घरांची तपासणी करण्यात आली. १९८१ पाणीसाठ्यांची तपासणी केली. याशिवाय वरील भागात १० तापाचे रुग्ण आढळून आले. त्यांना तत्काळ उपचार घेण्यास भाग पाडले. परंतु हे रुग्ण वातावरणातील बदलामुळे व्हायरलचे असल्याचे स्पष्ट झाल्याचेही प्रशासनातून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.