सीबीएसवर पोलिस गुल्ल, चोरट्यांचा डल्ला फूल्ल

सीबीएसवर पोलिस गुल्ल, चोरट्यांचा डल्ला फूल्ल

15507
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बस स्थानकात अडगळीत असलेले महिला सहाय्यता केंद्र. जेथे मदतीसाठी हाक मारावी तर कोणीही नसते. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

पोलिस गुल; चोरटे हाऊसफूल्ल!
मध्यवर्ती बसस्थानकात पाच महिन्यात ४५ चोऱ्या; प्रतिक्षालयातील गस्त केबिन-पोलिस गायब
लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : मध्यवर्ती बस स्थानकात पोलिस गुल आणि चोरट्यांचा धंदा हाऊसफुल्ल अशी अवस्था झाली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मध्यवर्ती बस स्थानकाचा (सीबीएस) समावेश आहे. तेथे स्वतंत्र पोलिसांची कायमस्वरुपी नेमणूक नाही. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते मे या पाच महिन्यात ७५ चोऱ्या झाल्या आहेत. या पैकी ६० टक्क्यांहून अधिक चोऱ्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील आहेत.
एखादी बस वेळेवर मिळाली नाही, तर प्रवाशाचे पुढील गणित बिघडते. त्यामुळे गावाचा फलक दिसला की प्रवासी कशाचीही पर्वा न करता बसमध्ये जागा पकडण्यासाठी धावतो. त्याचाच फायदा घेवून चोरट्यांकडून सोनसाखळी, महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्स, खिसे कापणे अशा घटना घडतात. अनेक वेळा संबंधित प्रवासी पुढील स्थानकावर उतरल्यानंतर त्याला चोरी झाल्याचे निदर्शनास येते. याच्या नोंदी शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाल्या आहेत. मात्र त्यानंतर आवश्‍यक त्या उपाय योजना होताना दिसत नाहीत.----------
चौकट
पोलिसांना शोधाण्याची वेळ
पूर्वी प्रवाशांच्या प्रतिक्षालयात पोलिसांची केबिन होती. तेथून बहुतांशी फलाट एका नजरेत होते. एखादे ठिकाण संशयास्पद वाटल्यास पोलिस स्वतः त्या ठिकाणी जात होते. मात्र हीच केबिन काढली आहे. त्यामुळे तेथे पोलिस सुद्धा नसतात. एखादा पोलिस ड्युटीवर असला तरीही त्याला मध्यवर्ती बसस्थानकात शोधावे लागले. पूर्वी प्रमाणेच पोलिसांची केबिन प्रतिक्षालयात उभारली, तर चोरांना काही प्रमाणात लगाम लावणे शक्य होईल.
------------
महिला सहाय्यता केंद्र अडगळीतच...
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका कोपऱ्या पोलिस मदत केंद्र आणि महिला सहाय्यता केंद्र म्हणून एक केबिन ठेवली आहे. सध्या तरी ती अडगळीतच असल्याचे चित्र आहे. तेथे महिलांना मदत करण्यासाठी महिला कॉन्स्टेबल सुद्धा नसतात. एखाद्या महिलेला सुरक्षेसाठी पोलिसांचा आधार घ्यावयाचा असल्यास त्यांनी कोणाकडे मदत मागायची?
-------------
चोरांपासून सावध रहा..
कोणती एसटी बस कोणत्या फलाटावर उभी आहे, कोठे जाणार आहे याची घोषणा मध्यवर्ती बसस्थानकांतून केली जाते. या वेळी वारंवार ‘चोरांपासून सावध रहा...’, ‘आपले साहित्य स्वतः सांभाळा’ अशा घोषणा दिल्या जातात. यावरून प्रवाशांनी आपल्या साहित्याची काळजी आपण करावयाची आहे. यासाठी पोलिस प्रवाशांना मदत करतील, अशी कोणतीही स्थिती स्थानकात दिसून येत नाही.
---------------
फलाटावर चोऱ्या अधिक
गडहिंग्लज, आजरा, चिपळूण, रत्नागिरी, कराड, मुबंई, सातारा अशा फलाटावर चोऱ्या अधिक होतात. अलीकडेच कोकणातील महिला शौचालयाला गेल्यानंतर परिसरातून उंची किंमतीचे मोबाईल हॅण्डसेट चोरीस गेले आहेत. काहींचे दागिने चोरीस गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे मध्यवर्ती बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनला आहे.
----------------
कोट
‘सीबीएस’वर आणखी पोलिसांची नियुक्ती करणार आहोत. इतर शहर, जिल्ह्यातील रेकार्डवरील चोरट्यांची छायाचित्रेही प्रदर्शित करणार आहोत. परिसरातील फेरीवाल्यांना विश्‍वासात घेवून त्यांचीही चोरट्यांनी शोधण्यासाठी मदत घेतली जाईल.
- अजय सिंदकर, पोलिस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com