शिवसेना मुंबई बैठक

शिवसेना मुंबई बैठक

Published on

फोटो आहे
-----

समीकरणे बदलली, पक्ष मजबूत करा

उद्धव ठाकरे ः लोकसभा-विधानसभा निवडणुकींबाबत मुंबईत घेतला आढावा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ११ः लोकसभा-विधानसभा निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. यापूर्वीची सर्वच समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने पक्ष मजबूत करावा, पक्षातील सर्व नेमणुका पूर्ण करा, त्याचा अहवाल वीस जुलैपर्यंत पक्ष कार्यालयाला पाठवा, अशा सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील बैठकीत दिल्या. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, खासदार विनायक राऊत, समन्वयक माजी आमदार दगडू संकपाळ बैठकीला प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘मातोश्री’वर बैठक बोलाविली होती. या बैठकीत जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपप्रमुख यांच्यासह इच्छुकांना आणि माजी आमदारांनाही आमंत्रित केले होते. दुपारी सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीत ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली आहे. लोकसभा मतदारसंघांसह सर्वच समीकरणे बदलली आहेत. लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. आपल्या पक्षाची निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. त्यासाठी वीस जुलैपूर्वी शाखा प्रमुख, तालुका प्रमुखांसह बूथपर्यंतच्या सर्व नेमणुकांबाबत माहिती द्या. पक्ष तळागाळापासून मजबूत करा, अशाही सूचना दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधातील हेवेदाव्यांबाबतही त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बैठकीला माजी आमदार संजय घाटगे, सत्यजित पाटील, उल्‍हास पाटील, सुजित मिणचेकर यांच्यासह जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव आणि संजय पवार आदी उपस्थित होते.
----
चेतन नरकेही इच्‍छुक, बैठकीला हजेरी
महाविकास आघाडीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अलीकडेच भेट घेतलेले ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी आज शिवसेनेच्या बैठकीत हजेरी लावली. त्यांच्यासोबत वडील अरुण नरके आणि बंधू संदीप हे देखील उपस्थित होते. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उत्सुक असल्याची चर्चा होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.