जिल्हा बँक धोरण एक, प्रत्यक्षात एक

जिल्हा बँक धोरण एक, प्रत्यक्षात एक

टप्प्यांमुळे होणार
कमी कर्ज पुरवठा
फेरविचार हवा; सरसकट कर्जाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आडसाली, पूर्व हंगामी, सुरु व सुरु खोडवा उसासाठी कर्जाचे विविध टप्पे केले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर वाढीव कर्जही दिले जाणार आहे. मात्र, वेगवेगळ्या टप्प्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज कमी प्रमाणात मिळणार आहे. त्यामुळे या टप्प्यांचा नव्याने विचार झाला पाहिजे किंवा आडसाली लागणीप्रमाणे सरसकट हंगामासाठी कर्ज मिळाले पाहिजे, अशी मागणी होत आहे.
जिल्हा बँकेकडून २०२३-२४ या हंगामासाठी जिल्ह्यासाठीचे पीक कर्जदर, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवल देण्याबाबत जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने विशेष सभेत निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्हा बँकेने आडसाली, पूर्व हंगामी, सुरु आणि ऊस खोडवा उसासाठी कर्ज वाटण्यासाठी विविध टप्पे केले आहेत. यामध्ये आडसालीसाठी हेक्टरी एक लाख ४० हजार रुपये तर रोप खरेदी व आंतर पीक लागणीसाठी १८ हजार रुपये जादाचे दिले जाणार आहे. तसेच, पूर्व हंगामीसाठी हेक्टरी एक लाख ३५ हजार व रोप खरेदीसाठी पाच हजार रुपये, सुरु उसासाठी हेक्टरी एक लाख ३५ हजार आणि ऊस रोप खरेदीसाठी ५ हजार रुपये आणि खोडवा उसासाठी १ लाख ८ हजार व पाचट व्यवस्थापन खर्च म्हणून नऊ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्ज देताना सर्व प्रकारच्या उसासाठी एकच दर लागू केले जाणार नाहीत. याची खबरदारी घेतली जाणार आहे. जिल्हास्तरीय समितीने निश्‍चित केलेले दरापेक्षा जास्त दर दिले, तर त्या शेतकऱ्यांना किंवा कर्जदारांना पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा लाभ मिळणार नाही. तसेच, घेतलेली रक्कम व्याजाने भरावी लागणार आहे. एखादा शेतकऱ्यांने आडसाली ऊस पिकासाठी कर्ज मंजूरी घेतली आहे. मात्र, आडसाली ऐवजी सुरु उसाची लागण आहे. अशा शेतकऱ्यांना सुरु ऊसाप्रमाणेचे कर्ज मिळणार आहे. सभासदांनी आडसाल उसाची लागणीसाठी जुलैमध्ये पिककर्जाची मागणी करायची आहे. नोव्हेंबरमध्ये पीककर्ज उचल करताना त्यांना साखर कारखान्यांकडे नोंद केलेल्या उसाची पावती किंवा करार पत्रक दाखवावे लागणार आहे. दरम्यान, या कर्जाच्या टप्प्यांमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी कमी-कमी कर्ज मिळत जाणार आहे. वास्तविक खर्चामध्ये फारसा फरक नसतानाही किंवा परतफेडीची क्षमता असताना कर्ज मर्यादा कमी केली जावू, नये अशी मागणी होत आहे.
-------------
कोट
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने विशेष सभेत घेतलेल्या निर्णयानुसार कर्ज वाटप केले जाणार आहे. तसे परिपत्रकही संस्थांना पाठवले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जास्ती-जास्त कर्ज वाटप कसे करता येईल, याचेच नियोजन आहे.
- जी. एम. शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी संचालक, जिल्हा बॅँक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com