झटका मशीन

झटका मशीन

Published on

17082

सौर धक्का मशिन करणार वन्यजीवांपासून पिकांचे रक्षण
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाचा उपक्रम; शाहूवाडीतील उखळूत यंत्रणा कार्यान्वित

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः शेतीत बारमाही राबून हातातोंडाला आलेल्या पिकांचा वन्यजीवांकडून फडशा पाडला जातो. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांत पीक घेणे बंद केले होते. यावर पर्याय म्हणून वन्यजीव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाने २२ सौर धक्का मशिन उखळू (ता. शाहूवाडी) गावातील शेतीत बसवली जात आहेत. त्यामुळे प्रकल्पालगतची शेती पुन्हा फुलण्यास मदत होत आहे. हा प्रयोग यशस्वी होत असल्याने अन्य गावांतही या मशिनचा वापर सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील पश्चिम भागातील घनदाट जंगलात वन्यजीवांचा वावर आहे. सात तालुक्यांपैकी शाहूवाडी तालुक्यातील काही गावे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत आहेत. त्या गावांतील शेतकऱ्यांची शेती प्रकल्पाला लागूनच आहे. डोंगरी व जंगली भाग आहे. या भागात रानडुक्कर, गवे, कोल्हे, मोर, माकड, बिबट्या अशा वन्यजीवांचा वावर सतत शेताकडे होतो. भात, नाचणी, ऊस, भाजीपाला अशा पिकांचे वन्यजीवांकडून नुकसान होते. गव्यांचा एखादा कळप भात, ऊस शेतीचे दरवर्षी नुकसान करतो, तर कधी बिबट्या आल्याच्या खाणाखुणा दिसल्यास दहा-बारा दिवस शेतीत जाऊन काम करणे मुश्कील होते. दरवर्षीचा हा उपद्रव होतो. त्यामुळे पाच वर्षांत काहींनी पीक घेणे बंद केले. त्यानंतर जवळपास २५० हेक्टर जमिनीवरील पेरणी थांबली. वन्यजीवांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्यावी, शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यजीवांचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केल्या.
त्याची दखल घेत वन्यजीव विभागाने पाहणी करून या भागात वन्यजीवांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना आखल्या. यात सौर धक्का मशिनचा पर्याय पुढे आला. त्यानुसार जवळपास दोनशेवर धक्का मशिन उखळू गावातील शेतीत लावण्यात येत आहेत.

चौकट
अशी आहे मशिनची रचना...
-विशिष्ट धातूच्या प्लेट सूर्यकिरणे शोषून घेतात
-मशिनच्या बॅटरीत सौर वीज तयार होते
-ही वीज कुंपण असणाऱ्या तारेला जोडली जाते
-वन्यजीवांचा तारेला स्पर्श झाल्यास सौम्य
धक्का बसून घाबरून बाजूला जातात
-वन्यजीवाला गंभीर दुखापत होत नाही
-२२ हजार रुपयांचे एक सौर धक्का मशिन
-एका मशिनवर दीड किलोमीटर क्षेत्रातील शेतीचे रक्षण
-शासनाचे १५ हजार रुपयांचे अनुदान
-शेतकऱ्याने ५ हजार भरून मशिन बसवता येते

कोट
आंबा, परळी, तळवडे, चांदोली, केर्ले, उदगीर, आंबाईवाडी आदी गावांत सौर धक्का मशिन बसविण्याचे नियोजन आहे. यंदाच्या वर्षी मशिनचा चांगला परिणाम होत असून, पुढील वर्षी आणखी काही गावांत हे मशिन वापरण्याबाबत विचार होणार आहे.
-एस. बी. नलवडे, वनक्षेत्रपाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.