वैद्यकीय पुरवणीसाठी लेख

वैद्यकीय पुरवणीसाठी लेख

---------
81533 83808, 85775, 39033

कोल्हापूर बनले
मेडिकल हब
एर्न्टो
मिरज, मुंबईच्या दिशेने दिवसाला धावणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या कमी झाली. या उलट सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगाव, सांगली, सातारा जिल्ह्यांतून गंभीर रुग्णांना कोल्हापूरमध्ये घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. हेही कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचे मोठे यश आहे. मेडिकल हब बनलेल्या कोल्हापूरच्या प्रगतीवर एक नजर...
- शिवाजी यादव
कोल्हापूरच्या वैद्यकीय उपचार सेवेच्या लौकिकात दिवसेंदिवस भर पडत असल्याच्या ठळक खुणा येथे दिसत आहेत. बाळाच्या जन्मापासून ते ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानापर्यंत सर्व उपचारपूरक सुविधा येथे उपलब्ध आहेत. पारंपरिक आयुर्वेदापासून ते ॲलोपॅथीपर्यंत, ॲलोपॅथीपासून ते निसर्गोपचारापर्यंतच्या विविध पॅथींच्या उपचारांची सेवा याद्वारे विविध आजारांतील गंभीर रुग्ण असो किंवा अपघातातील अतिगंभीर जखमींना जीवदान देण्यासाठी कोल्हापूरची आरोग्य व्यवस्था अधिक उपयोगी पडते आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचार सेवा, उपचार कालावधीत राहण्याची व्यवस्था, गंभीर आजारातून रुग्ण बरा झाल्याची अनेक उदाहरणे, यामुळे कोल्हापूरची ओळख ‘मेडिकल हब’ अशी होत आहे.
फार नाही, वीस वर्षांपूर्वी कोल्हापुरात अतिगंभीर रुग्णांवर उपचार करायचे झाल्यास तातडीने रुग्णवाहिकेत घालून मिरजेला जावे लागत होते. अगदीच उच्च वर्गातील रुग्ण असेल तर पुणे किंवा मुंबईत उपचारासाठी दाखल करावे लागत होते. मात्र, येथील एमबीबीएस डॉक्टरांनी पुढे एमडी केले. काहींनी एमएस केले तर काहींनी आरोग्यशास्त्रातील अन्य शाखांमध्ये विशेष वैद्यकीय ज्ञान संपादन केले. त्या बळावरच काहींनी क्लिनिकचे रूपांतर रुग्णालयात केले. रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केले आणि प्रसूतीपासून इमर्जन्सीपर्यंतच्या उपचार शाखांची सुविधा येथे निर्माण केली. त्यामुळे मिरज, मुंबईच्या दिशेने दिवसाला दोन-चार या संख्येने धावणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या कोल्हापुरात कमी झाली. या उलट सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगाव, सांगली, सातारा जिल्ह्यांतून गंभीर रुग्णांना कोल्हापूरमध्ये घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. हेही कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचे मोठे यश आहे.
कोल्हापुरात कोणत्या आजारावर उपचार होत नाहीत, असे अपवाद म्हणूनही म्हणता येणार नाही. कर्करोग, हृदयरोग, मेंदू विकार, वंध्यत्व निवारण, मधुमेहातील गुंतागुंतीचे आजार यापासून ते अवयव प्रत्यारोपणापर्यंत बहुतेक सर्वच पातळ्यांचे उपचार कोल्हापुरात सुरू आहेत. यानिमित्ताने केवळ पाच जिल्ह्यांतीलच नव्हे, तर परराज्यातील व परप्रदेशातील रुग्णही कोल्हापुरात उपचारासाठी येत आहेत, हे कोल्हापूरच्या वैद्यकीय उपचाराची महती सर्वदूर पोहचल्याचे चित्र आहे.
केवळ रुग्णालयात डॉक्टर भेटले, तपासणी वा उपचार केले किंवा शस्त्रक्रिया केली, उपचार झाले, रुग्ण बरा झाला, एवढ्यापुरतेच येथील डॉक्टरांचे योगदान मर्यादित नाही तर काही डॉक्टरांनी वर्षानुवर्षे आरोग्य उपचारविषयक संशोधन केले व त्या संशोधनाचे सादरीकरण राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदांमध्ये केले. त्यामुळे कोल्हापुरात वैद्यकीय क्षेत्रात नेमके काय संशोधन सुरू आहे, याची माहिती कदाचित कोल्हापूरच्या स्थानिक रुग्णाला नसेलही; पण देशविदेशातील असंख्य रुग्णांपर्यंत ही माहिती पोहोचली आहे. संशोधनात योग्य त्या पुराव्यानिशी व यशस्वी उपचार परिमाणांची माहिती दूरवर पोहोचवली गेल्याने अगदी विदेशातील रुग्णांचाही कोल्हापुरातील डॉक्टरांवर विश्वास निर्माण झाला आणि कोल्हापूरचा डॉक्टर आपल्याला आजारातून बरा करू शकेल, याचा रुग्ण व नातेवाईकांमध्ये विश्वास वाढला, ही बाब अलीकडच्या काळात कोल्हापुरात ठळकपणे समोर आली आहे.
अपघाताने मेंदूला इजा झालेली. अनेक मेंदूविकार तज्ज्ञांनी शस्त्रक्रियेस नकार दिला; पण तीच शस्त्रक्रिया कोल्हापुरातील मेंदूरोग तज्ज्ञांनी आव्हान म्हणून स्वीकारली आणि सलग सहा तास ते ३६ तासांची मॅरेथॉन मेंदू शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णाला पूर्ववत चालते-बोलते केले. हे यश कोल्हापुरात आहे. वर्षानुवर्षे मूल होत नाही म्हणून अनेक दवाखान्यांचे उंबरठे झिजवून व्यथित झालेल्या दाम्पत्याला अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देण्यासाठी कोल्हापुरातीलच डॉक्टरांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आणि निःसंतान दाम्पत्य माता-पिता बनले. संधिवातामुळे तसेच गुडघे झिजल्यामुळे कोणी परदेशी भगिनी अनेक देशांतील निष्णात डॉक्टरांचा सल्ला घेऊन थकली होती. नीट चालता येत नव्हते; मात्र कोल्हापूरच्या डॉक्टरांनी या महिलेवर उपचार केले आणि ती पूर्ववत चालू लागली. तिच्या पायांच्या व गुडघ्यांच्या हालचाली पूर्ववत झाल्या याचा आनंद व्यक्त करत, कमी पैशातही कोल्हापुरात उपचार होतात, याची पुराव्यानिशी खात्री त्या महिलेने परदेशात जाऊनही दिली.
कोरोना काळात तब्बल दीड लाख रुग्णांवर कोल्हापुरातच उपचार झाले आणि राज्यभरातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत जाताना कोल्हापुरात मात्र या उलट स्थिती होती. कोल्हापूरच्या बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टरपासून ती एमबीबीएस, एमडीपर्यंतच्या डॉक्टरांनी कोरोनावर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या उपचार सेवा दिल्या आणि मृतांचा आकडा रोखण्यात मोठे योगदान दिले. दिवस - रात्र खासगी तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय यंत्रणांनी केलेली धावपळ कोल्हापूरकर कधीही विसरू शकणार नाहीत. अशी अभूतपूर्व सेवा दिल्यामुळे जागतिक महामारीचे जीवघेणे संकट परतावून लावण्यात कोल्हापूरच्या डॉक्टरांना मोठे यश मिळाले.
कोल्हापुरातील अनेक रुग्णालयांत कर्करोग, प्रसूती उपचार, पोटविकारांच्या शस्त्रक्रिया अशा सुविधा आहेत. त्या पाठोपाठ सुपरस्पेशालिटी म्हणून कोल्हापुरातील बारा रुग्णालयांनी बहुविध व्याधींवर उपचाराची सेवा एकाच छताखाली देणे सुरू केले. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आयसीयू युनिट, व्हेंटिलेटर, सीटीस्कॅन, एमआरआयपासून ते पॅथॉलॉजी, औषधनिर्माण विभाग व मॉडिलर ओटीपर्यंतच्या सुविधा एका छताखाली दिल्या आहेत. यातून अतिगंभीर व मूर्च्छित अवस्थेत दाखल रुग्ण उपचार शस्त्रक्रियेनंतर बरा होऊन पुन्हा पूर्ववत चालू बोलू लागला, अशी सक्षम उपचार सेवा येथे उपलब्ध झाली. यातून रुग्णांचा कोल्हापूरच्या डॉक्टरांविषयीचा, त्यांच्या अनुभवाविषयीचा विश्वास वाढू लागला. याच मौखिक प्रचारातून सुरुवातीला कोल्हापुरातील, त्यानंतर परजिल्ह्यातील रुग्णही कोल्हापुरात उपचारासाठी येऊ लागले आणि येथील डॉक्टरांचे वैद्यकीय ज्ञान, त्यांच्याजवळची उपचारपूरक आधुनिक साधनसामग्री याविषयीचा लौकिक वाढला.
यातून जिल्हाभरात आज दिवसाला कमीत कमी ५० हजार रुग्ण कोल्हापुरात उपचार घेत असतात. यात जवळपास ५ ते ७ हजार रुग्ण जिल्ह्याबाहेरचे असतात. यातूनच कोल्हापूरच्या उपचार सेवेची माहिती दूरवर पसरत असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक सीमाभागातील अनेक रुग्ण बेळगावला जाण्याऐवजी किंवा गोव्याचे रुग्णालय जवळ असूनही तिकडे जाण्याऐवजी कोल्हापुरात येतात, हे येथील डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञानाचे अनोखे यश म्हणावे लागेल.
शासकीय रूग्णालय, सेवाभावी रुग्णालय तसेच कार्पोरेट रूग्णालयात मिळणाऱ्या उपचार सुविधा व रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांना राहण्यासाठी असलेली सुविधा यामुळे रुग्ण कोल्हापुरात उपचार घेण्याला प्राधान्य देत आहेत.
वंध्यत्व निवारणाऱ्या टेस्‍ट ट्यूब बेबीचा जन्म कोल्हापूरातील हॉस्पिटलमध्ये झाला. या प्रयोगापाठोपाठ आयव्हीएफ तंत्रज्ञान विकसित झाले. यात पाच दिवसांचा गर्भ तयार करून तो पुन्हा मातेच्या उदरात वाढविला जातो. अशा आशयाचे तंत्रज्ञान वापरले जात आहे.
सीपीआरसह पाच खासगी रुग्णालयांत रक्तपेशीचे आजार निर्मूलनासाठी अन्कॉलॉजीची शाखा सुरू झाली आहे. यात सीपीआर रुग्णालयात प्राथमिक अवस्‍थेतील कर्करोग केवळ औषधोपचारातून बरा करण्यात यश आले. गर्भाशयमुखाच्या कॅन्सरची प्राथमिक अवस्थेत तपासणी करणे (व्ही-आय स्क्रीनिंग)ची व्यवस्था तालुक्यातही झाली आहे. यातून वेळीच निदान होते. रुग्ण वेळीच उपचारास आल्यास तो बरा केला जातो. लिव्हर प्रत्यारोपणाची सुविधा करण्यासाठी येथील एका हॉस्पिटलने मुंबईतील एका कार्पोरेट हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला आहे. गेल्या पाच वर्षांत येथील खासगी रुग्णालयाने अवयवदानात आघाडी घेतली. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचे अवयव काढून ते प्रत्यारोपणासाठी पाठवले. यातून गंभीर आजारी रुग्णास जीवदान देण्यासाठी येथील खासगी रुग्णालयाचा हातभार लागला आहे.
नव्या काळात अत्याधुनिक उपचार यंत्रणा येथे आल्या. अन्य देशांच्या तुलनेत दंतोपचार भारतात सर्वांत स्वस्त आहेत. त्यासाठी लागणारी अत्याधुनिक उपचार पद्धती कोल्हापुरात आली आहे. यात दंत प्रत्यारोपणाचा कालावधी मोजक्या दिवसांवर आणला आहे. त्यात उपचार घेण्यासाठी परराज्यातील उच्च वर्गातील रुग्ण कोल्हापुरात येत आहेत. कर्करोगींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यासंबंधीची अत्याधुनिक उपचार सेवा येथील बारा खासगी रूग्णालयात कर्करोगाचे अचूक निदान व उपचार शस्त्रक्रिया केमो थेरपी, समुपदेशन आदी सेवा एकाच छताखाली आहेत. त्याद्वारे हजारो रुग्ण बरे झाले आहेत. भाजलेले किंवा अपघातातील जखमी किंवा दिसून येणारे व्यंग कायमस्वरूपी काढून टाकून प्लास्टिक सर्जरीचा अति उच्च पर्यायही कोल्हापुरातील एका खासगी प्लास्टिक सर्जरी सेंटरने पुढे आणला आहे. हजारो रुग्णांची प्लास्टिक सर्जरी येथे झाली.
हृदयविकाराचा झटका आल्यास त्याच्यावर तातडीने होणारी उपचार सेवा येथे प्रभावी आहे. विनाछेद हृदयशस्त्रक्रिया किंवा बायपास सर्जरीचा पर्याय कोल्हापुरात जवळपास आठ रुग्णालयांत आहे. सीपीआर रुग्णालयात तर दीड वर्षाच्या बाळापासून ९६ वर्षांच्या वृद्ध आजींवर विनाछेद हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. विशेषतः गरजू घटकांतील व्यक्तींच्या शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये मोफत होत आहेत.
शस्त्रक्रियेसाठी लागणारी निर्जंतुकीकरणाची अती उच्चश्रेणीची मॉड्युलर ओटी जवळपास बाराहून अधिक रुग्णालयांत आहे. तशी सुविधा सीपीआरमध्येही आहे. कान, नाक, घशाची तसेच म्युकर मायकोसीसची उपचार शस्त्रक्रिया येथे झाली. याशिवाय किडनी शस्त्रक्रिया, दुर्बिणीतून शस्त्रक्रियांची सुविधा बहुतेक बड्या रुग्णालयांत आहे. स्त्रीरोग, मानसोपचार, सौंदर्यशास्त्र, त्वचा विकार, फिजिओथेरपी उपचार शाखाही येथे आहेत.

एक नजर व्यवस्थेवर
क्लिनिक सेवा - दोन हजार
एकूण रुग्णालये - १६००
दैनंदिन रुग्णसंख्या - ५० ते ६० हजार
शासकीय रुग्णालये - ४२३
१०८ रुग्णवाहिका - ३६
खासगी रुग्णवाहिका - ८०
रक्तपेढ्या - १३
शवागृहे - चार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com