बाजार समिती

बाजार समिती

Published on

बाजार समितीकडून पूरग्रस्तांसाठी सुविधा

कोल्हापूर , ता. १४ ः दमदार पावसामुळे पुराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी शेती उत्पन्न बाजार समितीने हॉलमध्ये निवाऱ्याची सोय केली आहे. तसेच मार्केटयार्ड आवारात जनावर बाजार परिसरात जनावरांसाठी निवारा केला आहे. याशिवाय बापट कॅम्पमधील मूर्तिकारांनाही येथे मूर्ती ठेवण्यासाठी जागेची सुविधा उपलब्ध केली आहे. बाजार समितीचे सभापती भारत पाटील यांनी या सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर आहे, राधानगरी धरणही भरले आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे. जिल्हा प्रशासनानेही २०१९ व २०२१ ला ज्यांच्याकडे पूर आला होता, अशा पूरग्रस्तांनी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार यंदाही पाण्याची पातळी वाढली, तर मार्केट यार्डासमोरील जाधववाडी, बापट कॅम्प, मुक्तसैनिक वसाहत, इंद्रजित कॉलनी, घोडकेवाडीत अनेकांच्या घरात पुराचे पाणी जाऊ शकते. अशा लोकांसाठी बाजार समितीने मागील दोन महापुराच्या वेळी शाहू सांस्कृतिक मंदिरात निवारा केंद्र उपलब्ध केले होते. यंदा शाहू सांस्कृतिक मंदिर डागडुजीसाठी बंद आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून मल्टिपर्पज हॉलमध्ये लोकांना राहण्याची सोय केली आहे. याशिवाय ज्यांची जनावरे आहेत, त्यांना भाजी मार्केटच्या भाजी बाजाराच्या शेडजवळ जनावरे बांधता येणार आहेत. त्यासाठी चाऱ्याची उपलब्धताही केली जाणार आहे.
दरम्यान, बापट कॅम्पमध्ये काही मूर्तिकारांच्या शेडमध्ये पाणी जाते. मूर्ती भिजून नुकसान होते. गणेश उत्सव जवळ आल्याने मूर्तिकामाला वेग आला आहे. अशात तयार झालेल्या मूर्ती पावसात भिजून नुकसान होऊ नये, यासाठी मार्केट यार्डातील काही अडत दुकानांच्या शेडमध्ये मूर्ती ठेवण्याची सुविधा दिली आहे. या सर्व सुविधा पुराचे पाणी वाढलेल्या काळापुरत्या मिळणार आहेत, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.