पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्तीचा घोळ

पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्तीचा घोळ

Published on

ich268.jpg
19155
इचलकरंजी : पंचगंगा स्मशानभूमी पुराच्या पाण्याखाली गेली आहे.
------------
पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्तीचा घोळ
निवेदन, आंदोलनाच्या इशाऱ्यानंतरही प्रतीक्षाच; पुराच्या पाण्याखाली गेल्याचे कारण

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २६ : शहरातील अनेक सामाजिक, राजकीय संघटनांकडून निवेदन, आंदोलनाचे इशारे, मात्र तरीही पंचगंगा स्मशानभूमीस दुरुस्तीसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
स्मशानभूमीचे काम नगरोत्थान योजनेद्वारे निविदा प्रक्रियेत घेतले आहे. निविदा भरण्याची मुदत ५ जून होती. त्यानंतर जवळपास ४५ दिवस दुसरे निविदा पाकीट उघडले नव्हते. सध्या स्मशानभूमी पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेल्याने दुरुस्ती पुढे ढकलत असल्याचे ठोस कारण महापालिका प्रशासनास मिळाले आहे; मात्र महापालिकेची विविध कामे न करताच ठकेदारांची बिले काढल्याचे उघडकीस येत असताना अत्यावश्यक सेवेसाठी प्रतीक्षा का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
इचलकरंजी महापालिकेची पंचगंगा स्मशानभूमी अनेक महिने दुरवस्थेत आहे. स्मशानभूमी शेडच्या छताचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे दहन करताना पडणारा पाऊस अडथळा निर्माण करत असल्याने स्मशानभूमी शेडची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी विविध संघटना, नागरिकांकडून करण्यात येत होती.
महापालिकेने पंचगंगा स्मशानभूमीमधील मुख्य दहन शेडचे पत्रे बसवणे व दुरुस्तीसाठी ६ लाख ७४ हजार ७२१ रुपयांची निविदा १२ मे रोजी प्रसिद्ध केली होती. निविदा भरण्याची अंतिम मुदत ५ जून होती. ६ जूनला पहिले टपाल उघडले होते, मात्र दुसरे टपाल उघडण्याची ४५ दिवसांची मुदत संपूनही उघडले नव्हते. इचलकरंजी शहरात वर्षाकाठी सुमारे १ हजार ५०० नागरिकांच्या मृत्यूची नोंद महापालिकेकडे होत असते. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामधील संख्या वेगळीच आहे. त्यानुसार पंचगंगा स्मशानभूमीमध्ये दररोज सुमारे ४ ते ५ मृतदेह दहन होतात. शहरात शहापूर व पंचगंगा अशा दोन स्मशानभूमी असल्या तरी अधिकतर अंत्यविधी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये होतात. पंचगंगा स्मशानभूमीमधील शेडचे पत्रे पूर्ण खराब झाल्याने पावसाळ्यात दहन विधी वेळी समस्या निर्माण होण्याची शक्यतेने ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. दरम्यान, महापालिका प्रशासन दोन दिवसांत स्मशानभूमी कामाचा कार्यादेश काढणार असल्याचे सांगत आहे, मात्र सध्यातरी पुराचे पाणी कमी होईपर्यंत काम सुरू करणे शक्य नाही.
---------------
एकाच स्मशानभूमीवर इचलकरंजीचा भार
पंचगंगा स्मशानभूमी ही पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शहर परिसरातील दहन शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये करण्यात येत आहेत. एकाच स्मशानभूमीवर अधिक दहन होत असल्याने रक्षा विसर्जनासाठी नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. दहनास लागणारे साहित्य तेथे उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
----------------
पंचगंगा स्मशानभूमीत दर महिन्याला सुमारे २०० अंत्यविधी व रक्षाविसर्जन होत असतात. महापालिका प्रशासनाने येथील सुविधांकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे असताना त्यामध्ये हलगर्जीपणा केला जातो. सध्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पावसात अंत्यविधी व रक्षाविसर्जन करावे लागत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे.
-उमेश पाटील, उपाध्यक्ष, इचलकरंजी नागरिक मंच
--------------------
स्मशानभूमी दुरुस्ती कामाचा कार्यादेश गुरुवारी काढण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदाराने कामाचे मेजरमेंट घेतले आहे. पुराचे पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहे. पाणी कमी झाल्यास तत्काळ काम सुरू करण्यात येणार आहे.
-संजय बागडी, नगर अभियंता महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.