आंबोली घाटात लुटीचा बनाव

आंबोली घाटात लुटीचा बनाव

Published on

19169
सावंतवाडी ः मासे वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो.

आंबोली घाटात लुटीचा बनाव
रत्नागिरीच्या दोघांचा प्रताप; विसंगत उत्तरांमुळे कट उघड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ : आंबोली घाटात चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील लाखो रुपयांची रक्कम व मोबाईल अनोळखी व्यक्तींनी लुटल्याचा बनाव आज रत्नागिरी येथील दोघा युवकांनी केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत गाडीचे हप्ते फेडण्यासाठी हा बनाव केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यानंतर त्यांच्यावर अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरेश तलवार व ओमकार किर अशी त्यांची नावे आहेत. ते, मंगळवारी (ता.२५) रत्नागिरी येथून टेम्पोतून मासे घेऊन बेळगाव येथे गेले होते. आज परतत असताना त्यांनी शक्कल लढवत सोबत असलेले लाखो रुपये परस्पर हडप करण्याच्या हेतून बनाव रचला. या प्रकारानंतर पोलिस यंत्रणेची धावपळ झाली; मात्र चौकशीत दोघांकडून विसंगत उत्तरे मिळाल्याने बनाव उघड झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः ओमकार याने दोन वर्षांपूर्वी छोटा टेम्पो हप्त्यावर घेतला होता. कर्ज थकीत होते. दरम्यान, त्याला मंगळवारी रत्नागिरी येथील एका मासे व्यावसायिकाचे भाडे मिळाले. टेम्पोतून मासे घेऊन तो बेळगावला गेला. त्याने सोबत मयुरेशला घेतले. माशांची रक्कम संबंधित बेळगाव येथील व्यक्तीने ओमकार व मयुरेश यांच्याजवळ देऊन ती रत्नागिरीतील मासे व्यावसायिकाजवळ देण्यास सांगितले. ती रक्कम घेऊन ते बेळगाव येथून सकाळी निघाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास ते आंबोली घाटात आले असता त्यांनी ती रक्कम हडप करण्याचा कट रचला आणि ते टेम्पोतून आंबोलीतून खाली बावळाट येथे आले. तेथील पोलिसांना त्यांनी आपल्याला दोन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रक्कम मोबाईल लुटल्याचे सांगितले. तेथील पोलिसांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्या, असे सांगितल्यानंतर ते टेम्पोसहित पोलिस ठाण्यात पोहचले.
तेथे बनाव केलेली हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब तपासाची यंत्रणे हाती घेत दोघांसहीत पुन्हा आंबोली गाठली. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्यांची सविस्तर चौकशी केली असता त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता त्या दोघांनी हा बनाव केल्याचे उघड झाले. तशी कबुलीही त्यांनी काही वेळाने देत टेम्पोमध्ये लपवून ठेवलेली रक्कमही पोलिसांकडे सुपूर्त केल्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले. टेम्पोचा हप्ता भरायचा आहे. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या टेम्पोचे तब्बल १२ लाख रुपये भरायचे आहेत. त्यामुळे आपण हा प्रकार केल्याचे ओमकार यांनी सांगितले. शिवाय गाडीला भाडे नसल्याने हप्ते चुकले आहेत. ही रक्कम घेऊन आपण गाडीचे हप्ते फेडणार होतो, असे त्याने सांगितले. एकूणच या प्रकाराबाबत पोलिसही चक्रावून गेले. दरम्यान, या घटनेबाबत त्यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.