नद्यांमधील गाळ

नद्यांमधील गाळ

शहरांलगतच्या पूररेषेतच गाळमुक्तीचे धोरण

प्राधान्यक्रम निश्‍चित : जिल्ह्यात ११ नद्यांतील ६१ कि.मी.मधीलच गाळ निघणार

अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. २६ : नद्यांमधील गाळ काढण्याचे शासनाचे बहुचर्चित धोरण लवकरच अंमलात येणार आहे. प्राधान्याने शहरांजवळून वाहणाऱ्या नद्यांचे निश्‍चित केलेल्या पूररेषेच्या अंतरातीलच गाळ काढण्याचा निर्णय पहिल्या टप्प्यात झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११ नद्यांमधील ६१ किलोमीटरचेच अंतर गाळमुक्त होईल.
वाळू व गाळ उपसाबंदीमुळे नदीपात्रांचे सपाटीकरण झाले आहे. यामुळे पुराचा धोका वाढतच आहे. म्हणून नद्यांच्या वहनमार्गातील अडथळे दूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पूरबाधित क्षेत्रातील शहरातून वाहणाऱ्या नद्यांमधील पुराचा प्रभाव कमी करणे, नद्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी नदीपात्रातील गाळाने निर्माण झालेली बेटे व अडथळे दूर करण्याचे धोरण यापूर्वीच ठरवले आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. २५) याबाबत काढलेल्या अध्यादेशाद्वारे गाळ काढण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. २०१९ च्या महापुरानंतर जलसंपदा विभागातर्फे प्रत्येक नद्यांलगत असणाऱ्या शहरांच्या अंतरात निळी व लाल पूररेषा निश्‍चित केली आहे. हीच पूररेषा गृहीत धरुन केवळ त्याच अंतरातील गाळ काढण्याच्या सूचना आहेत. या पूररेषेनुसार शहरी वसाहतीत पुरामुळे अधिक जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता विचारात घेवून राज्यातील १४२ नद्यांच्या लांबीपैकी पूररेषा निश्‍चित केलेल्या १ हजार ६४८ किलोमीटर अंतरातीलच गाळ काढला जाईल. विशेष म्हणजे या अंतरातही अधिकाधिक गाळ साठून नद्यांच्या प्रवाहात मोठे अडथळे निर्माण झालेल्या भागातीलच गाळ प्राधान्याने काढण्याचे आदेश आहेत.
गाळ काढण्याच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांची समिती कार्यरत राहील. समितीचे सदस्य सचिव ‘जलसंपदा’चे कार्यकारी अभियंता असतील. गाळ काढण्याची जबाबदारी जलसंपदाच्या यांत्रिकीकरण विभागाकडे आहे. ही कार्यवाही प्राधान्यक्रम ठरवून पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने होईल. त्यासाठी आवश्यक तेथे ‘जलसंपदा’ने नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्यासह अशासकीय संस्था, खासगी कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या मदतीनेही गाळ काढण्याचे नियोजन करावे, अशी सूचनाही शासनाने दिली आहे. निश्‍चित केलेल्या अंतराचे सर्वेक्षण करुन खर्चाच्या आराखड्याला मंजुरीनंतर जलसंपदाला निधी वर्ग होईल. उपलब्ध निधीतून किती अंतर गाळमुक्त होणार, हे ठरेल.

चौकट...
*नदीचे नाव *गाळमुक्त होणारे अंतर (कि.मी.)
-------------------------------------
*वारणा *५
*कडवी *३
*कासारी *५
*भोगावती *५
*पंचगंगा *१५
*हिरण्यकेशी *३
*ताम्रपर्णी *६
*घटप्रभा *४
*वेदगंगा *१०
*कृष्णा *३.४०
*जांभळी *२
------------------------------------

* गाळमुक्त कार्यवाहीची वैशिष्ट्ये
- गाळाची विल्हेवाट, लिलाव, वापर व हिशेब ‘महसूल’कडे
- काढलेल्या गाळासाठी आधी जागा निश्‍चितीकरणाची सूचना
- शेतकऱ्यांना विनारॉयल्टी गाळ मिळणार
- पुन्हा गाळ न येण्यासाठी अभियांत्रिकी व जैविक उपाय राबवणार
- गाळ काढण्याच्या कार्यवाहीवर ‘जलसंपदा’चे नियंत्रण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com