आणखी किती दिवस आपल्या मातीतील कलाकारांना डावलणार?

आणखी किती दिवस आपल्या मातीतील कलाकारांना डावलणार?

आणखी किती दिवस आम्हाला डावलणार?

शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील कलाकारांची विचारणा; परीक्षण, दिग्दर्शनात नव्या चेहऱ्यांना संधी द्या

संतोष मिठारी, सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः परीक्षण, दिग्दर्शन करण्याची क्षमता आणि अनुभव असून देखील आणखी किती दिवस आम्हाला डावलणार आहात?, अन्य विद्यापीठांप्रमाणे स्वतंत्र सांस्कृतिक विभाग सुरू करायला काय अडचण आहे?, जिल्हा आणि मध्यवर्ती महोत्सवाच्या तारखा जाहीर करायला विलंब का लागतो?, अशी विचारणा शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील कलाकारांनी केली आहे. महोत्सवात नावीन्य येण्यासाठी किमान तीन वर्षांनी दिग्दर्शक, तर स्पर्धांतील मूल्यमापन पारदर्शक होण्यासाठी परीक्षक बदलावेत. त्यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी त्यांनी केली.
विद्यापीठ, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित असते. त्यात या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणारे युवामहोत्सव हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. सध्या महोत्सव म्हणजे ‘नॅक’चे गुण मिळविण्यासाठीची औपचारिकता म्हणून त्याकडे विद्यापीठ, महाविद्यालयांकडून पाहिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. परीक्षक, दिग्दर्शक नियुक्ती ते राज्यस्तरीय इंद्रधनुष्य महोत्सव, पश्‍चिम विभागीय महोत्सवात सादर होणारे कलाप्रकार पाहता एकसारखापणा आहे. परीक्षक, दिग्दर्शक म्हणून ज्या बाहेरील लोकांना नियुक्त केले जात आहे, ते अन्य विद्यापीठांसाठी देखील काम करतात. त्यामुळे मध्यवर्ती महोत्सवात सादर झालेले आपल्या लोकनृत्य, लोककलेचे सादरीकरण ‘कॉपी’ करून इतरांना राज्यस्तरीय, पश्‍चिम विभागीय महोत्सवासाठी देण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार विद्यापीठ परिक्षेत्रातील कलाकारांनी केली आहे. त्याने कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या मातीत घडलेल्या उदयोन्मुख कलाकारांना डावलण्याचा प्रकार विद्यापीठाच्या पातळीवर होत आहे. ते यापुढे झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा या कलाकारांनी दिला आहे.
(उत्तरार्ध)
......
कोट
‘विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला सध्या तोच-तोच आणि साचेबद्धपणा आला आहे. ते बदलण्यासाठी किमान तीन वर्षांनी मार्गदर्शक, दिग्दर्शक बदलावेत. नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी. त्यात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कलाकारांचा प्राधान्याने समावेश करावा. परीक्षक नियुक्तीत सध्या मुंबईतील लोकांचे अधिक प्रमाण जादा दिसते. राज्यातील इतर जिल्ह्यांत देखील चांगले कलाकार, तज्ज्ञ असून त्यांचाही विचार विद्यापीठाने करावा. विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कलाकारांच्या युवा महोत्सवाबाबतच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करावी.
-शैलेश शिंदे, दिग्‍दर्शक
...
‘नॅक’च्या गुणांसाठी असाही प्रकार
युवा महोत्सवातील सहभाग, कामगिरीवर महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनामध्ये पाच गुण मिळतात. त्यासाठी आणि आपले नाव व्‍हावे या उद्देशाने काही महाविद्यालये चुकीचा प्रकार करत आहेत. व्यावसायिकपणे काम करणाऱ्या काही कलाकारांचे ‘एफ. वाय.’साठी कागदोपत्री ॲडमिशन, पात्रता करून त्याचे विद्यार्थी म्हणून ओळखपत्र तयार केले जाते. त्याला महोत्सवात सहभागी केले जाते. असा प्रकार अत्यंत चुकीचा असून त्याने खऱ्या आणि कलागुण असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेवून विद्यापीठाने अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याची मागणी काही प्राध्यापक, प्राचार्यांनी केली.
.....
कलाकारांनी उपस्थित केलेले प्रश्‍न
*विद्यार्थी विकास विभागाऐवजी सांस्कृतिक विभागामार्फत युवा महोत्सवाचे नियोजन करायला अडचण काय?
*दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यस्तरीय महोत्सव होतो. त्याची माहिती असून देखील जिल्हा, मध्यवर्ती महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर करायला विलंब का?
*मुंबईशी संबंधित असलेल्या काही ठराविक पाच ते सहा चेहऱ्यांनाच दिग्दर्शक, परीक्षक म्हणून नियुक्ती देण्याचे कारण काय?
*विद्यापीठ सध्या ३२ कलाप्रकारांत महोत्सव घेते. त्यात लघुपट निर्मिती, नाट्यसंगीत, गझल, कव्वाली, धनगरी ओव्या, आदी नव्या कलाप्रकारांचा समावेश का होत नाही?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com