मराठी चित्रपटांना थिएटर द्या,  चित्रीकरण स्थळे विकसित करा

मराठी चित्रपटांना थिएटर द्या, चित्रीकरण स्थळे विकसित करा

24983
...

मराठी चित्रपटांना थिएटर द्या

कलाकार, तंत्रज्ञांच्या विविध सूचना; समिती दोन महिन्यांत शासनाला अहवाल देणार


कोल्हापूर, ता. २१ ः मराठी चित्रपटांना उद्योगाचा दर्जा आणि थिएटर उपलब्ध करून द्या. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात चित्रीकरण स्थळे विकसित करा. मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास समाजासमोर मांडण्यासाठी म्युझिअम तयार करा, अशा विविध सूचना आज कोल्हापुरातील कलाकार, तंत्रज्ञांनी राज्य शासनाच्या सांस्कृतिक धोरण निश्चिती समितीकडे केल्या.
या समितीने शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात चित्रपट धोरण फेरआढावा बैठक घेतली. त्यासाठी समिती सदस्य कोल्‍हापूर चित्रनगरीचे संचालक संजय पाटील, दिग्‍दर्शक गजेंद्र अहिरे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्‍यक्ष मेघराज भोसले, पुरुषोत्तम लेले, गीता देशपांडे, आरोह वेलणकर, पंकज चव्हाण, राजेश प्रभू साळेगावकर आदी उपस्थित होते.
शासनाने मराठी चित्रपटांना उद्योगाचा दर्जा द्यावा. चित्रपट क्षेत्रात योगदान देणाऱ्या दादासाहेब फाळके, भालजी पेंढारकर यांच्याबाबतच्या छोट्या चित्रफिती थिएटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखवाव्यात. ‘थिएटर ऑन व्हिलस्’ संकल्पना राबविण्यात यावी, आदी सूचना या बैठकीत दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, व्यवस्थापकांनी केल्या. राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी चित्रपट, नाट्य, अशा विविध उपसमित्या नेमण्यात आल्या आहेत. ही समिती त्यांच्या क्षेत्रातील विविध घटकांची मते या फेरआढावा बैठकीत जाणून घेत आहेत. मुंबई, दिल्ली येथे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत समितीची बैठक झाली आहे. कोल्हापूरनंतर आता, मुंबई, नागपूरमध्ये बैठक होईल. त्यामध्ये होणाऱ्या सूचना एकत्रित करून त्याबाबतचा अंतिम अहवाल आम्ही शासनाला सादर आहोत, असे लेले आणि भोसले यांनी सांगितले.
...
कोल्हापुरातील चित्रकर्मींमुळे दिशा मिळाली
कोल्हापूरमधील चित्रकर्मी जागरूक आहेत. मराठी चित्रपटांबाबत त्यांच्यामध्ये तळमळ आहे. त्यांनी केलेल्या सूचनांतून समितीला धोरणाबाबत विविध चांगले मुद्दे आणि दिशा मिळाली असल्याचे अहिरे यांनी सांगितले. निर्माते, तंत्रज्ञ, व्यवस्थापक, आदी घटकांसाठी प्रशिक्षण शिबिरे घ्यावीत. ओटीटी, आयओटीच्या आव्हानांबाबत मार्गदर्शन करावे. चित्रपट अनुदानाबाबत शासनाने कायमस्वरूपी धोरण ठरवावे, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.
...
चित्रीकरणाची संख्या वाढेल
कोल्हापूरच्या चित्रनगरीसाठी सरकारने सुमारे ४४ कोटींचा निधी दिला असून त्यातून विविध कामे त्याठिकाणी सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर साधारणतः पुढील वर्षी एप्रिल-मे याठिकाणी वेगळे चित्र पाहायला मिळेल. येथे चित्रीकरणाची संख्या वाढलेली दिसेल, असे संजय पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com