आजरा ः पंचायत समिती आंदोलन बातमी
01884
आजरा ः आंदोलकांनी गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्याशी त्यांच्या दालनात चर्चा केली.
-----------------------
दप्तर दिरंगाईबाबत आजऱ्यात ठिय्या
आजऱ्यात गर्जना संघटनेतर्फे आंदोलन ः गटविकास अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २१ ः आजरा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न व दप्तर दिरंगाईबाबत येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन झाले. प्रकाश बेलवाडे यांच्या नेतृत्वाखाली गर्जना संघटनेच्यावतीने ठिय्या धरला. यावेळी झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांबाबत ऊहापोह झाला. प्रलंबित प्रश्न व दप्तर दिरंगाईबाबत तातडीने कार्यवाही करणार असल्याची ग्वाही गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांनी दिली.
प्रकाश बेलवाडे, संतोष बेलवाडे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक स्तरावरील प्रलंबित प्रश्न मांडले. प्रश्नांची सोडवणूक होत नाही तोपर्यंत हलणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. श्री. दाईंगडे व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. सामान्य नागरिक, शेतकरी, सरपंच, महिला बचत गट यांच्या वैयक्तिक प्रलंबित प्रश्नांचा निपटारा केला. तसेच काही गावांतील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समवेत दप्तर तपासणी, स्थळ पाहणीसाठी गावानुसार तारीख निश्चित केली. त्यासंदर्भातील लेखी पत्र श्री. दाईंगडे यांनी दिले. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रवेशव्दारावर ग्रामसेवक यांची कार्यालयीन वेळ प्रसिद्ध केली जाईल. ग्रामपंचायतीकडील दाखले त्याचे शासकीय शुल्क याची माहिती लावली जाईल. असे निर्णय झाले. संतोष बेलवाडे, गणेश शिवणे, रवींद्र तेंबुगडे, संभाजी सरदेसाई, शंकर कदम, विक्रम गोईलकर, रवींद्र लोखंडे, महेश कांबळे, महादेव खाडे, विठ्ठल कदम, दिगंबर कदम, दिगंबर मिसाळ, महादेव रामाने आदी उपस्थित होते.
----------
पुन्हा आंदोलन करण्यास भाग पाडू नका. जनतेचे प्रश्न सोडवा
-प्रकाश बेलवाडे