चंदगड आगाराला मिळेनात वाहक

चंदगड आगाराला मिळेनात वाहक

chd121.jpg
37457
नागनवाडी ः बेळगाव मार्गावरील गाडी अचानकपणे रद्द झाली की विद्यार्थ्यांची अशी गर्दी होते.
----------------------------
चंदगड आगाराला मिळेनात वाहक
२२ जणांची कमतरता, गाड्या रद्द करण्याची वेळ; प्रवाशांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १३ ः एकेकाळी ग्रामीण विभागात राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या येथील आगाराकडे काही वर्षापासून वाहकांची कमतरता आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून वाहकच दिले जात नसल्याचे चित्र आहे. तब्बल २२ वाहक कमी असल्याने दिवसभरात अनेक मार्गावरील फेऱ्या रद्द करण्याची वेळ येत आहे. स्थानिक प्रशासनाला नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागतेच परंतु मार्गावर गाडीच्या प्रतीक्षेत प्रवाशांचीही गैरसोय होते. विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.
आगाराच्या माध्यमातून दिवसभरात २८२ फेऱ्यांचे वेळापत्रक राबवले जाते. या सर्व फेऱ्या सुरळीत होण्यासाठी ९५ वाहक आणि ११६ चालकांची गरज आहे. प्रत्यक्षात ७३ वाहक आणि १०५ चालक आहेत. वाहक मोठ्या संख्येने कमी असल्यामुळे एकेका वाहकाला दोन, तीन जादा फेऱ्या कराव्या लागतात. अधिकाऱ्यांकडून वाहकांना विनंती करुन जादा फेऱ्या मारण्यास प्रवृत्त केले जाते. वाहकातील अंतर्गत समझोत्यावरही काही वाहक जादाची फेरी करतात. परंतु अनेकदा विविध कारणांनी त्यांच्याकडून जादा फेरीला नकार दिला जातो. त्यांची स्वतःची ड्युटी पूर्ण झालेली असल्याने प्रशासनही सक्ती करु शकत नाही. अशा वेळी संबंधीत मार्गावर केवळ वाहक नाही म्हणून गाडी रद्द करावी लागते. सायंकाळी पाच वाजल्यानंतरच हा प्रश्न निर्माण होतो. यावेळी शहरातून नोकरी, व्यवसाय करुन पतरणारे नोकरदार तसेच विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. गाडी रद्द केल्यामुळे त्यांचा घरी जाण्याचा प्रश्न निर्माण होतो. एकाचवेळी मोठ्या संख्येने प्रवाशी असल्याने खासगी वाहनांनाही मर्यादा येते. विशेषतः बेळगाव मार्गावरील गाडी रद्द झाल्यास चंदगड, नागनवाडी, हलकर्णी येथे शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालय व धनंजय विद्यालयामध्ये शिनोळीपासूनचे विद्यार्थी आहेत. शेकडोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहतात. मुख्य मार्ग असल्याने आणि वयोपरत्वे खोडसाळपणा करीत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या शिक्षकांवर येते. त्यांच्याकडून आगार प्रशासनाला जाब विचारला जातो. प्रशासनाला समोरच्याचे ऐकून घेणे एवढाच पर्याय राहतो.
------------------
आगाराकडून सातत्याने अचानकपणे गाडी रद्द केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घरी परतण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या पालकांशी संपर्क साधून नियोजन राबवावे लागते. शाळा प्रशासनाला त्रास होतो.
- महादेव भोगुलकर, मुख्याध्यापक, संजय गांधी विद्यालय, नागनवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com