लम्पीने लावला ‘कामधेनू’ला ब्रेक!

लम्पीने लावला ‘कामधेनू’ला ब्रेक!

लम्पीने लावला ‘कामधेनू’ला ब्रेक!
पशुसंवर्धन विभागाची योजना : गतवर्षीचीच गावे आहेत लाभाच्या प्रतीक्षेत
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : लम्पीच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम पशुसंवर्धनच्या सर्वच बाबींवर होताना दिसत आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची शिबिरे रद्द केली आहेत. त्यामुळे शिबिरांवरच भर असलेल्या कामधेनू दत्त ग्राम योजनेला ब्रेक लागला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या उद्दिष्टात समाविष्ट असलेली गावे अद्याप योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.
दुग्ध उत्पादन वाढीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक ग्राम योजना राबवली जाते. या योजनेतंर्गत निवड केलेल्या गावासाठी एक लाख ५२ हजार ५०० रुपयांचा निधी उपलब्ध होतो. पशुपालक मंडळ स्थापना, पशुपालकांची सहल, जनावरांची जंतनाशक शिबिरे, खनिजद्रव्य मिश्रण व जीवनसत्वांचा पुरवठा, गोचिड-गोमाशा निर्मूलन शिबिर, वंधत्व निवारण व औषधोपचार शिबीर, वैरण विकास कार्यक्रम, जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक यासह नावीण्यपूर्ण उपक्रमावर ही रक्कम खर्च केली जाते.
दरवर्षी या योजनेसाठी प्रत्येक तालुक्यातील किमान पाच ते दहा गावांची निवड केली जाते. मात्र, लम्पीच्या प्रादूर्भावाचा फटका कामधेनू दत्तक ग्राम योजनेलाही बसल्याचे दिसून येत आहे. लम्पीची पहिली लाट ओसरली असे वाटत असताना तीन-चार महिन्यांपासून पुन्हा प्रादूर्भाव वाढू लागला. आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची शिबिरे घेण्यावर बंदी घातली आहे. कामधेनू दत्तक ग्राम योजनेत प्रामुख्याने शिबिरांवरच भर दिला जातो. साहजिकच या योजनेच्या अंमलबजावणीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.
--------------
नव्या वर्षात अंमलबजावणी शक्य
लम्पीबाधित जनावरांची संख्या तुलनेत कमी होत आहे. गडहिंग्लज उपविभागातील हे चित्र आहे. पण, शिरोळ, हातकणंगले परिसरात अद्याप पूर्ण नियंत्रण मिळवता आलेले नाही. परिणामी, येत्या दोन-तीन महिन्यात तरी शिबिरांना परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. परिस्थितीत सुधारणा झाली तर नव्या वर्षातील पहिल्या तिमाहीत कामधेनू दत्तकग्राम योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
------------------
यंदाचेही उद्दिष्ट मिळावे
वास्तविक लम्पीच्या पहिल्या लाटेमुळे २०२१-२२ च्या उद्दिष्टात समाविष्ट असलेल्या गावात गतवर्षी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. तर गतवर्षीच्या उद्दिष्टाला आता लम्पीच्या दुसऱ्या लाटेमुळे ब्रेक मिळाला आहे. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी, तारेवाडी, कानडेवाडी, मांगनूर तर्फ सावतवाडी, नूल या गावांचा समावेश आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी होणाऱ्या वर्षाच्या विलंबाची ही साखळी तोडण्यासाठी यंदाचेही उद्दिष्ट देणे आवश्यक आहे. लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन्ही वर्षांच्या उद्दिष्टाची एकत्रित अंमलबजावणी करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com