गर्दीच्या वेळी महाद्वार रोडवरील वाहतूक बंद ठेवणार

गर्दीच्या वेळी महाद्वार रोडवरील वाहतूक बंद ठेवणार

37707

गर्दीच्या वेळी महाद्वार रोडवर वाहतूक बंद
महेंद्र पंडित ः व्यापारी, व्यावसायिकांसमवेत चर्चा ः नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः यंदा नवरात्रोत्सवात करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेवून वाहतूक व्यवस्थेचे आम्ही नियोजन करत आहोत. गर्दीच्या वेळेत महाद्वार रोडवरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. गर्दी नसेल त्यावेळी वाहतूक सुरू राहिल. दुकानाच्या दारात व्यापारी, व्यावसायिकांनी मंडप घालू नयेत. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज येथे दिला.
दसरा-दिवाळीच्या काळात महाद्वार रोड वाहतुकीसाठी खुला ठेवण्याची मागणी येथील व्यापारी, व्यावसायिकांनी केली होती. या अनुषंगाने कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या सभागृहात आयोजित महानगरपालिका, पोलिस प्रशासन आणि व्यापारी, व्यावसायिकांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिक्के, ‘जुना राजवाडा’चे पोलिस निरीक्षक सतीश गुरव, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते.
पंडित म्हणाले, ‘यंदा भाविक, पर्यटकांची संख्या ३० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांना त्रास होवू नये यादृष्टीने वाहतूक, पार्किंग आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी व्यापारी, व्यावसायिकांनी सहकार्य करावे. दसरा-दिवाळी व्यापारी, व्यावसायिकांसाठी महत्त्वाची असल्याने त्यांची अडचण केली जाणार नाही.’
गुरव म्हणाले, ‘गर्दीची परिस्थिती लक्षात घेवून महाद्वार रोडवरील वाहतूक सुरू ठेवणे अथवा बंद करण्याचा निर्णय ड्युटीवरील पोलिस कर्मचारी घेतील. गर्दी नसल्यास बॅरिकेड लावून मार्ग बंद केले जाणार नाहीत. गुजरीतील मार्गावर दुहेरी पार्किंग नसेल.’
टिक्के म्हणाले, ‘कसबा गेट, महाद्वार रोड परिसरातील बंद असणारी पार्किंग महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून खुली करून घेतली जातील.’ महाद्वाररोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण नकाते म्हणाले, ‘बेकायदेशीरपणे रस्त्यमध्ये बसणाऱ्या व्यावसायिक, फेरीवाले यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी.’ माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, ‘पालखीच्यावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून तेथील नियोजन पोलिस प्रशासनाने करावे.’ सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड म्हणाले, ‘गुजरीमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी.’
शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सचिन जाधव, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, सराफ संघाचे विजय हावळ, प्रितम ओसवाल, संजय रांगोळे, किरण गांधी, शिवाजी पाटील, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे जयंत गोयाणी, मनोज बहिरशेट, प्रशांत मेहता, पंकज भांबुरे आदी उपस्थित होते.
................
चौकट
महेंद्र पंडित म्हणाले
-वाहतुकीच्या नियोजनासाठी सुमारे ४५० कर्मचारी
-महाद्वार रोडवर दिवसभर अतिक्रमण निर्मूलन आणि पोलिस पथकाचा वॉच
-बेकायदेशीरपणे रस्त्याच्यामध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करणार
-व्यापारी, व्यावसायिकांनी वर्षभर प्रशासनाशी संवाद साधावा
-सकाळी ८ ते रात्री १० यावेळेत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद
...................
चौकट
पट्ट्याबाहेर आल्यास कारवाई करणार
महानगरपालिकेने मारून दिलेल्या पट्ट्याच्या आत फेरीवाल्यांनी बसावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा आडसूळ यांनी दिला. महाद्वार रोडवर अतिक्रमण निर्मूलन पथक दोन शिफ्टमध्ये फिरत राहणार आहे. स्वच्छतेसाठीचे पथक तीन शिफ्टमध्ये काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
..................
चौकट
सीसीटीव्हीसाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा
महाद्वार रोडचा सर्व परिसर सीसीटीव्हीच्या नजरेखाली आणण्यासाठी सराफ संघ आणि व्यापारी असोसिएशनने सहकार्य करावे, असे आवाहन गुरव यांनी केले. त्यावर यासाठी निश्‍चितपणे मदत केली जाईल, अशी ग्वाही नकाते यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com