ग्रामविकास अधिकाऱी लाच घेताना अटक

ग्रामविकास अधिकाऱी लाच घेताना अटक

37729
...
प्रयाग चिखलीचा ग्रामसेवक
लाच घेताना जाळ्यात

घराचा उतारा देण्यासाठी मागितली दोन हजारांची लाच

सकाळ वृत्तसेवा
प्रयाग चिखली , ता. १३ ः राहत्या घराचा गावठाण उतारा देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्याला (वर्ग ३) त्याच्याच येथील कार्यालयात रंगेहाथ अटक करण्यात आली. गोरख दिनकर गिरीगोसावी (वय ५०, रा.पंत मंदिरजवळ, शिवाजीनगर, कणेरीवाडी, ता.करवीर. मूळ रा. सिंगापूर, ता.पुरंदर, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरांची झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांना बँकेत कर्ज प्रकरणी मंजुरी मिळवण्याकरिता त्यांच्या राहत्या घराचा गावठाण उतारा पाहिजे होता. त्यासाठी त्यांनी प्रयाग चिखली (ता.करवीर) ग्रामपंचायत येथे उतारा मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो उतारा देण्यासाठी गिरीगोसावी हा टाळाटाळ करीत होता. अखेर उतारा देण्यासाठी गिरीगोसावी याने तक्रारदाराकडे दोन हजारांची लाचेची मागणी केली. हक्काचा उतारा मिळण्यासाठीही लाच द्यावी लागत असल्यामुळे तक्रारदाराने थेट येथील शनिवार पेठीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गिरीगोसावीच्या विरोधात तक्रार केली. तक्रारदाराच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर आज दुपारी गिरीगोसावी काम करीत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच पंच साक्षीदारांसह छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. अवघ्या काही मिनिटांत ही कारवाई झाली. उपअधीक्षक सरदार नाळे यांच्यासह निरीक्षक बापू साळुंके, हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, सचिन पाटील, मयुर देसाई, रूपेश माने, संदीप पवार, पुनम पाटील, विष्णु गुरव यांनी ही कारवाई केली.
...

कार्यपद्धतीबाबत पूरग्रस्तांमधून संताप

गिरीगोसावी हा जून २०२२ पासून प्रयाग चिखली येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. येथील पूरग्रस्तांना आवश्यक असलेल्या दाखल्यांबाबत तो लाच मागायचा. त्यामुळे येथील पूरग्रस्तांमधून त्याच्या कार्यपध्दतीबाबत संताप व्यक्त होत होता. काही दिवसांपूर्वी सदस्यांना विश्वासात न घेता त्याने येथील अंगणवाडीसाठी आवश्यक नसलेले तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य भरमसाट बिले लावून खरेदी केले. यावर ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र आक्षेप घेऊन हे साहित्य परत पाठवण्यास भाग पाडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com