मुश्रीफ पत्रपरीषद

मुश्रीफ पत्रपरीषद

सीपीआरमधील ‘त्या’ प्रकरणांची
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ : विविध कामांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः सीपीआरमध्ये झालेल्या पडदे खरेदी प्रकरणापासून ते औषधे व उपचारपूरक साधन सामुग्री खरेदी प्रकरणापर्यंत जेथे गफलती झाल्या, त्यांची उच्चस्तरीय चौकशी होईल. त्यासाठी आठवड्याभरात चौकशी समिती कार्यान्वित होईल. सीपीआरला एमआरआयची सुविधा देण्यात येईल, तसा धोरणात्मक निर्णय झाला आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
सीपीआरमधील पायाभूत व उपचारपूरक सुविधा सक्षम करण्यासाठी ४३ कोटी निधी मंजूर केला आहे. यातून गटर्स, इमारत रंगवणे, रस्ते करणे अशी कामे प्राधान्याने होतील, असे सांगून श्री मुश्रीफ म्हणाले की, सीपीआरला औषध खरेदीसाठी विविध पातळीवर मान्यता घ्यावी लागत होती. त्यात बदल करून स्थानिक पातळीवर औषधे खरेदीचे अधिकार अधिष्ठाता तसेच जिल्हा नियोजनमधून खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे पैसे नाहीत म्हणून औषध खरेदी नाही असे होणार नाही.’’
ते म्हणाले, ‘वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स वर्ग १ व वर्ग २ च्या जागा भरण्यासाठी प्रक्रीया सुरू आहे. जिथे डॉक्टर्स मिळणार नाहीत तेथे कंत्राटीतत्वावर डॉक्टर्स घेतले जातील, वर्ग तीनची भरती आक्टोबर अखेरही भरती प्रक्रिया पूर्ण होईल. ४ वर्गासाठी जिल्हा पातळीवर बिंदू नामावली प्रमाणे भरती होईल.’’
मुंबईत अवयव प्रत्यारोपणाची सुविधा आहे. अवयव प्रत्यारोपणाचा खर्च ५० लाखांच्या घरात आहे. अशात अवयव मागणीची प्रतीक्षा यादीही मोठी आहे. गरजू घटकांना त्याचा लाभ मिळणे मुश्कील होते. त्यामुळे किमान यकृत व किडनी प्रत्यारोपनासाठी लागणारी सुविधा सीपीआरला उपलब्ध करू. मात्र अवयवदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. अवयवदानामुळे किती लोकांचे प्राण वाचतात, याबाबत प्रबोधनाची गरज आहे. असेही त्यांनी सांगितले.
शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, डॉ. अजित लोकरे, डॉ. शिशीर मिरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे उपस्थित होते.

दृष्टिक्षेपात....
सीपीआरमध्ये रक्तासह विविध तपासणी सुविधा सक्षम होतील.
रूग्णांची लक्षणे, तपासणी, उपचार संगणक प्रणालीत (एचएमआय) नोंद होतील अशी सुविधा होईल.
एमआरआय व सिटी स्कॅन सुविधा देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला.
डॉक्टर्स वेळेत यावे, सेवा द्यावी अशा सूचना अधिष्ठातांना दिल्या.

चौकट
सीपीआरमध्ये प्रथमच खुबारोपण यशस्वी
सीपीआरच्या अस्थिव्यंगोपचार विभागात पार्वती कुंभार (वय ७०) यांच्यावर खुब्याचे प्रत्यारोपणाची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये प्रथमच झाली. अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. राहूल बडे, डॉ. गिरीश मोटे यांच्या पथकाने खुबारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. भूलतज्ज्ञ डॉ. आरती घोरपडे यांनी भूल दिली. अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी मार्गदर्शन केले. वरद बिल्डर्स् डेव्हलपर्सचे संजय चव्हाण यांनी ४५ हजार रूपयांची मदत शस्त्रक्रियेसाठी केली. याबद्दल श्री मुश्रीफ यांनी सीपीआरच्या वैद्यकीय पथकांचे अभिनंदन केले. पार्वती कुंभार यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com