ऊस दराचा चेंडू

ऊस दराचा चेंडू

कारखान्यांना पहावे लागणार शेतकऱ्यांचे हित
दराचे त्रांगडे सोडवणार कधी : शेतात जास्त दिवस ऊस ठेवणे नाही परवडणारे
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : जिल्ह्यात उसाचा तुटवडा जाणवणार आहे. यातच उन्हाचा तडाखा उसाला मारक ठरणार आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी गेल्यावर्षीच्या ऊस दरात काही ना काही तोडगा काढून गळीत हंगामाला गती दिली पाहिजे, असे चित्र आहे. काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसला तरीही आता कारखानदारांना हा तोडगा काढण्यास पुढाकार घ्यावा लागणार आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या गळीत हंगामातील ६० टक्के साखर शिल्लक आहे. एप्रिल २०२३ मध्ये प्रतिक्विंटल साखरेचा सरासरी ३४७९ रुपये मूल्यांकन केले होते. या वेळी प्रत्यक्ष बाजारभाव ३४०० रुपये होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये कारखान्यांकडे असणाऱ्या साखरेचे मूल्यांकन ३४७९ केले होते. आता प्रत्यक्ष प्रतिक्विंटलचा दर हा ३८०० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे कारखान्यांनी केलेल्या मूल्यांकनापेक्षा प्रत्यक्ष बाजारभावानुसार प्रतिक्विंटल साखरेला ३२१ ते ३५० रुपये जादा मिळत आहेत. हाच दर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी केली जात आहे. एक टन उसापासून साखर, इथेनॉल, प्रेसमड, बगॅस, को-जन मधून ४९४० रुपये कारखान्यांना मिळतात. तर, एक टन ऊस तोडणी-ओढणी, प्रक्रिया खर्च, व्याजासह इतर १४०० रुपये उत्पादन खर्च होतो. त्यामुळे मिळणाऱ्या रक्कमेतून उत्पादन खर्च वजा केल्यास कारखान्यांकडे प्रतिटन ३५४० रुपये शिल्लक राहत आहे. यातून किमान ४०० रुपये मिळावेत किंवा या दरात तडजोड करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तयार आहे. कारखान्यांनीही आता पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी म्हणून काही रक्कम देण्याची तयारी दर्शवावी लागणार आहे. तरच यंदाचा गळीत हंगाम कारखाने आणि शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही.कारखान्यांनी आता यावर तत्काळ निर्णय घेऊन हंगाम सुरू करण्याचे आवाहनही केले आहे. आता कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ना काही रक्कम जाहीर करावी लागणार आहे. तरच, यंदाचा हंगाम कोणत्याही संकटाविना सुरू होण्यास अडथळा येणार नाही.
.....

१ टन उसापासून तयार होणाऱ्या पदार्थ व त्यांची सध्या बाजारातील किंमत
पदार्थ*किलो*दर*एकूण रक्कम
साखर*११५*३६ रुपये*४१४०
इथेनॉल*३.३*६०.७५ रुपये*२००
प्रेसमड*३५*४ रुपये* १४०
बगॅस*७०*२ रुपये*१४०
को-जन*८०*४ रुपये*३२०
एकूण*--*--*४९४० रुपये
...............

१ टन उसापासून साखर किंवा उपपदार्थांसाठी कारखान्यांकडून होणार खर्च
खर्च* रुपये
तोडणी-ओढणी*७५० रुपये
प्रक्रिया खर्च*४५० रुपये
व्याज* २०० रुपये
एकूण खर्च* १४०० रुपये
.......

‘कारखान्यांनी तत्काळ तोडगा काढला पाहिजे. त्यांच्याकडून तोडगा काढण्यासारखी परिस्थिती आहे. शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट केली आहे. आता त्यांच्या कोर्टात चेंडू गेला आहे.
-राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com