आली दिवाळी

आली दिवाळी

लोगो ः आली दिवाळी
-
43010

विशेष मुलांनी साकारले आकाशकंदील
‘त्यांच्या’ चेहऱ्यावर निर्मितीचा आनंद; दिवाळीमुळे मिळते स्वावलंबनाची दिशा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः गलका, गोंधळ नाही, कोण कागद कापतोय, कोण तो चिटकवतोय, कोण झुरमुळ्या तयार करतोय तर कोणी बांबूच्या काठ्या तयार करतोय. प्रत्येकजण आपापल्या कामात दंग आणि त्या हातातून एक-एक आकाशकंदील साकारतो. आकाशकंदील पूर्ण झाला, की निर्मितीच्या तेजाचा आनंद त्यांच्याही चेहऱ्यावर प्रकाशमान होतो. येथील चेतना विकास मंदिर या संस्थेतील हे चित्र.
दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे शहरातील शेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिर, क्रशर चौकातील जिज्ञासा विकास मंदिर व राही पुनर्वसन केंद्र या संस्थेतील विशेष मुलांकडून आकाशकंदील साकारू लागले आहेत. राही पुनर्वसन केंद्रात आकाशकंदिलांसोबत उटणे, पणत्या व लक्ष्मीपूजनाच्या पुड्याची निर्मिती होत आहेत. शिक्षण घेतानाच व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण मिळावे व त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, यासाठी शहरातील या संस्था प्रयत्नशील आहेत. शाळेतील मुलांना त्यांच्या आवडीनुसार कामे दिली आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने त्यांना स्वावलंबनाची दिशा मिळते. यंदाही चेतनामधील विद्यार्थ्यांनी २५ हजारांवर आकाशकंदील व पणत्या बनविल्या आहेत. आकर्षक रंगसंगती, बारीक नक्षीकाम, घडीकाम, लहान मोठे आकार व पानाफुलांपासून मॉडर्न आर्टपर्यंत नावीन्यपूर्ण आकाशकंदील बनले आहेत. गणेशोत्सवानंतर लगेचच त्यांनी साहित्य बनविण्यास सुरूवात केली. दिवसातील सहा ते सात तास कष्ट करून दिवाळीचे हे साहित्य ते साकारत आहेत. त्यांनी बनवलेल्या आकाशकंदिलांना यंदाही परदेशातून मागणी आहे.

चौकट
निर्माल्यापासून तयार केली धुपकांडी
दरवर्षी चेतनातील मुले सांघिक कामगिरीतून आकाशकंदील साकारतात. त्यांच्या कल्पकतेतून बनलेल्या आकाशकंदिलांना मोठी मागणीही असते. मात्र, याचवेळी विशेष मुली मात्र हातावर हात ठेवून शांत बसतात. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांना यंदा या मुलींना देवाला वाहिलेली फुले सुकल्यानंतर त्या निर्माल्यापासून सुगंधित धुपकांडी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या अभिनव प्रयोगामुळे मुलींनी बनविलेल्या धुपकांडीमुळे यंदाची दिवाळी सुगंधाने दरवळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com