डॉ. अर्जुन चव्हाण अभिनंद ग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा

डॉ. अर्जुन चव्हाण अभिनंद ग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शाहू सिनेट सभागृहात प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण अभिनंदन ग्रंथ लोकार्पण आणि ग्रंथाचे प्रकाशन करताना मान्यवर.
...
लिहिण्याची सवय माणसाला अमर बनवते
डॉ. मोहनलाल छिपाः प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण अभिनंदन ग्रंथाचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : ‘लिहिण्याची सवय माणसाला अमर बनवते. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी ही सवय जपली आहे. इतरांनाही लिहिण्यासाठी प्रेरित केले आहे. हिंदी विश्वभाषा बनली पाहिजे, यासाठी डॉ. चव्हाण यांनी यापुढे लेखन करावे. कारण त्यांच्या लेखणीत तेवढी ताकद आहे,’ असे प्रतिपादन भोपाळ येथील अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्‍वविद्यालयाचे संस्थापक कुलपती डॉ. मोहनलाल छिपा यांनी केले.
प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण अभिनंदन ग्रंथ लोकार्पण आणि सत्कार समितीतर्फे आज शिवाजी विद्यापीठातील शाहू सिनेट सभागृहात हा कार्यक्रम झाला. ‘इक्कीसवीं सदी के विविध विमर्श : प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण ग्रंथाचे’ प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. दरम्यान, डॉ. चव्हाण अभिनंदन ग्रंथ तथा सत्कार समितीतर्फे डॉ. चव्हाण यांचा मानपत्र, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार केला. अनिल मकर यांनी लेखन केलेले आणि अनुप जत्राटकर यांनी तयार केलेल्या डॉ. चव्हाण यांच्या जीवनकार्यावर आधारित डॉक्युमेंटरी सभागृहात दाखविण्यात आली.
प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, ‘डॉ. चव्हाण यांचे काम हे एकलव्यासारखे आहे. त्यांना कोणीही गॉडफादर नाही. जे काम आहे, ते समर्पित होऊन करायचे, ही त्यांची खासीयत आहे. हिंदी साहित्य क्षेत्रात त्यांनी मोलाचे काम आयुष्यभर केले. अनेक ग्रंथ लिहिले. भारतातील विविध हिंदी मंचांवर त्यांचा वावर आहे. कलम, जबान, जीवनी या तिन्ही गोष्टी त्यांच्या आत्म्याशी जोडल्या गेल्या आहेत. ज्या ग्रंथाचे लोकापर्ण आज झाले, तो ग्रंथ हा एक ऐतिहासिक दस्तावेज ठरला आहे. तो येणाऱ्या काळात सर्वांना उपयुक्त ठरेल.’
याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, नवी दिल्लीतील ज्ञानपीठ प्रकाशनचे अरुण माहेश्‍वरी, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख डॉ. शंकरसिंह बुंदेल, मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय मुरुमकर, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. मनोहर भंडारे, डॉ. रमेशकुमार गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. सरोज बिडकर यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. यादवराव धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शकुंतला सरुपरियाजी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी आभार मानले.
...
अवतीभोवतीच्या वातावरणानेच
लेखनासाठी प्रेरित केले
डॉ. अर्जुन चव्हाण म्हणाले, ‘माझ्या अवतीभोवतीचे जे सामाजिक वातावरण मी अनुभवत, घडत गेलो, त्या वातावरणानेच मला लेखनासाठी प्रेरित केले. आयुष्यभर मी सामान्य जीवनशैलीत जगण्याचा प्रयत्न केला. कोणाची मुद्दाम उपेक्षा केली नाही आणि कोणाकडून फार अपेक्षाही केली नाही. माझ्या कुटुंबीयांच्या पाठबळामुळे मी आजवरचा जीवन प्रवास करू शकलो आहे. या पुढेही माझे लेखन कार्य अविरत सुरू राहील.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com