राजकीय बातमी

राजकीय बातमी
Published on

सरकारनामा ... लोगो
...
शेवटपर्यंत ‘पत्ते’ रहाणार गुलदस्त्यातच
लोकसभेचे रणांगण ः महायुतीच्या निर्णयानंतरच ‘महाविकास’ चा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची सुरु असलेली धरसोड वृत्ती आणि महायुतीच्या जागा वाटपांसह उमेदवारीचा लांबलेला निर्णय पाहता दोन्ही आघाड्यांकडून जागा आणि उमेदवारीचे ‘पत्ते’ गुलदस्त्यातच रहाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत ४२ जागा व तिथले उमेदवार यांचा निर्णय झाला आहे. उर्वरित जागा वाटपाच्या निर्णयासाठी पाच मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ‘वंचित’ चे ॲड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात यांची अंतिम बैठक होत आहे. या बैठकीतच राज्यातील महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यात भाजप विरोधात जे जे म्हणून प्रादेशिक पक्ष एकत्र येणार आहेत, त्यांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून वंचित बहुजन आघाडीही ‘महाविकास’ सोबत कशी येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. `वंचित’ ने २७ जागांचा प्रस्ताव दिला असला तरी यापैकी किती जागा आम्हाला मिळणार अशी विचारणा ‘महाविकास’ कडे केली आहे. तत्पुर्वीच आंबेडकर यांनी अकोल्यातून स्वतःचीच उमेदवारी जाहीर केली आहे. ‘वंचित’ ची धरसोड भूमिका आणि ‘महाविकास’ कडून त्यांच्या प्रस्तावावर लांबत चाललेली चर्चा पाहता हा प्रश्‍न सहजासहजी लवकर मिटण्याची शक्यता नाही.
दुसरीकडे भाजपने लोकसभेसाठी १९५ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा काल केली. त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवार निश्‍चिती होत नाही तोपर्यंत ‘महाविकास’ कडूनही अधिकृत घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. ‘महाविकास’ च्या या सावध भूमिकेमुळेही ‘महायुती’ चा निर्णय लांबण्याची शक्यता आहे. त्यातून आचारसंहिता जाहीर होईपर्यंत जागा वाटप व उमेदवारांचा निर्णय जाणीवपूर्वक लांबवला जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाव्यात, अशी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मागणी आहे. त्यातही कोल्हापूर लोकसभेसाठी ते आग्रही आहेत. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उमेदवार चालतील, पण जागा शिवसेनेला द्या, अशी त्यांची भूमिका आहे. ठाकरे यांच्या या भुमिकेमुळे ‘महाविकास’ च्या नेत्यांची पंचाईत झाली आहे. यावर तोडगा निघण्यापूर्वीच सांगलीतून विशाल पाटील यांनी काँग्रेसमधूनच लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे. हातकणंगलेतून ‘स्वाभिमानी’ चे माजी खासदार राजू शेट्टी ‘एकला चलो रे’ च्या भुमिकेत असले तरी त्यांनीही ‘महाविकास’ चा पाठिंबा मिळाला तर घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ‘महाविकास’ च्या नेत्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी अंतिम निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांची मात्र घालमेल कायम रहाणार आहे.
...
सतेज पाटील दिल्लीला रवाना
महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांची प्रमुख जबाबदारी असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आज तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. पक्ष नेतृत्वाने त्यांना तातडीने बोलवले आहे. पाटील यांच्या दिल्ली दौऱ्यात मोठ्या घडामोडीची शक्यता आहे. त्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही जागांच्या निर्णयाच्या हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com