

68870
...
न्यू कॉलेजला पाच कोटी निधी
पालकमंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील यांच्या हस्ते नव्या अकरा मजली इमारतीचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समाजात चांगल्या पद्धतीने पुढे घेवून जाण्याचे काम श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संस्था आणि न्यू कॉलेज करत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अकरा मजली इमारत साकारण्याचे महत्त्वाचे पाऊल न्यू कॉलेजने टाकले आहे. ही इमारत पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही’, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
मंत्री मुश्रीफ यांनी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या फंडातून ५० लाखांचा निधी लोकसभेच्या निवडणुकीनंतर दिला जाईल, असे सांगितले. ‘केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अकरा विद्यापीठांना एकूण २४० कोटींचा निधी दिला आहे. आता लवकरच राज्यातील शंभर महाविद्यालयांना प्रत्येकी पाच कोटी रुपये देणार असून त्यात न्यू कॉलेजचा समावेश असेल’, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
येथील न्यू कॉलेजच्या प्रांगणात प्रस्तावित अकरा मजली इमारतीच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘कोल्हापुरात सुपर स्पेशालिटी स्वरूपातील वैद्यकीय सुविधा सुरु करण्याचे माझे स्वप्न आहे. त्याअंतर्गत अकराशे बेडच्या हॉस्पिटलनंतर आता शंभर विद्यार्थिनींसाठीचे नर्सिंग कॉलेज सुरू करत आहे.’
मंत्री पाटील म्हणाले, ‘या इमारतीसाठी सीएसआर फंडातून विविध कंपन्या निश्चितपणे मदत करतील.’ कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बांधलेल्या विस्तारीत चार मजली इमारतीचे उदघाटन झाले. संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, उपाध्यक्ष डी. जे. किल्लेदार, सचिव एस. जे. मेटील, खजानीस वाय. एस. चव्हाण, संचालक वैभव नायकवडी, सई खराडे, पी. सी. पाटील, सी. आर. गोडसे, पी. के. पाटील, वाय. एल. खाडे, माजी आमदार सुरेश साळोखे, उपप्राचार्य डॉ. रघुनाथ ढमकले आदी उपस्थित होते.
बांधकाम समिती प्रमुख प्रा. विनय पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी कॉलेजची माहिती दिली. डॉ. मनीषा नायकवडी, प्रा. उमा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनी आभार मानले.
शतकमहोत्सवी संस्थांना निधी मिळावा
मालोजीराजे छत्रपती म्हणाले, ‘कॉलेजच्या या इमारतीसाठी माजी विद्यार्थी म्हणून मदत करणार आहे. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेसारख्या अनेक संस्था शतकमहोत्सव साजरा करत आहेत. त्यांना राज्य सरकारने पाठबळ द्यावे.’
चौकट
मुश्रीफ-पाटील-मालोजीराजे एकाच गाडीत
भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे एकाच गाडीतून छत्रपती शाहू स्टेडियममध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी रवाना झाले. उमेदवारीवरुन कोल्हापूर लोकसभेचे रणांगण तापले असताना जिल्ह्यातील या नेत्यांनी एकाच चारचाकीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.