उन्हाळ्यामुळे जनावरांची आवक निम्म्यावर

उन्हाळ्यामुळे जनावरांची आवक निम्म्यावर

gad109.jpg
70231
गडहिंग्लज : आठवडा बाजारात जनावरांची आवक कमी होती. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------
उन्हाळ्यामुळे जनावरांची आवक निम्म्यावर
फळभाज्यांचे भाव स्थिर : फळांचा राजा आंबा दाखल; वांगी सावरली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : वाढत्या उन्हाळ्यामुळे जनावरांच्या बाजारात मागणी नसल्याने आवक निम्‍म्यावर घसरली आहे. भाजी मंडईत फळभाज्यांचे भाव स्‍थिर आहेत. कोबी, फ्‍लॉवर, टोमॅटोची जास्त आवक आहे. पंधरवड्यात उतरलेल्या वांग्याचे दर सावरत आहेत. फळांचा राजा आंबा कोकणातून दाखल झाला आहे. पण, दर अधिक असल्याने तो सर्वसामान्यांसाठी अजून महिनाभर आंबट राहण्याची चिन्हे आहेत.
पंधरा दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. मुळातच यंदा कमी पावसाने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच जनावरांच्या बाजारात म्हैशींची आवक मंदावली आहे. दर आठवड्याच्या तुलनेत निम्‍म्याने आवक झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. सुमारे ५० आवक नोंदली होती. पण, मागणीअभावी व्यवहार जेमतेमच होते. चाळीस हजार ते लाखापर्यंत दर होते. शेळ्या-मेंढ्याची तर केवळ वीसभर आवक दिसली. गाई आणि बैलजोड्यांची आवक झाली नाही. पाऊस सुरू झाल्यानंतरच जनावरांच्या बाजारात आवक वाढू शकेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
भाजी मंडईत हिरव्‍या मिरचीचा दर दहा किलोमागे १०० रुपयांनी वधारला आहे. ढब्बू, वरणा, दोडका, बिन्स, कारली यांचे दर स्‍थिर आहेत. कोथिंबीर दहा रुपये पेंढी होती. पालेभाज्या ७ ते १० रुपये पेंढी आहेत. वांगी २५० ते ३५० रुपये दहा किलो आहेत. गेल्या आठवड्यापेक्षा १०० रुपयांनी दर सावरला आहे. कांदा, लसूण आणि बटाट्याचे भाव कायम आहेत. फळ बाजारात कोकणातील हापूस दाखल झाला आहे. डझनाचा १२०० ते १५०० रुपये दर असल्याने फळांचा राजा सर्वसामान्यांसाठी अद्याप आंबटच आहे. स्थानिक आंबे दाखल झाल्यावरच महिन्‍याभरानंतर हे दर कमी होतात. द्राक्षे ५०, डाळिंब, संत्री, पेरू, चिक्कू ८० रुपये किलो आहेत.
--------------------
विक्रेते, ग्राहकांची तारांबळ
दोन दिवसांपासून मुसळे टिकटी ते दसरा चौक हा मुख्य रस्ता राष्ट्रीय महामार्गासाठी उखडला आहे. या मार्गावरच लोकांची अधिक ये-जा असल्याने विक्रेत्यांची गर्दी असते. पण, हा मार्गच बंद असल्याने विक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातून बाजाराला आलेल्या ग्राहकांनाही याचा फटका बसला. पर्यायी मार्गाचा कुठेच उल्लेख नसल्याने कोठून जायचे, असा प्रश्न वाहनधारकांना पडला होता.
----------------
* बाजार दृष्‍टिक्षेपात
- कोबी, टोमॅटो, फ्‍लॉवर अधिक
- लिंबू, काकडी, कलिंगडाला मागणी
- गवार, बिन्स, वरणा कमी
- द्राक्षांची आवक टिकून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com