कोल्हापूर आता आंतराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी प्रयत्न :मुख्यमंत्री

कोल्हापूर आता आंतराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी प्रयत्न :मुख्यमंत्री

70309
कोल्हापूर ः येथील विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री हसन मुश्रीफ. शेजारी (डावीकडून) धैर्यशील माने, राजेश क्षीरसागर, धनंजय महाडिक, संजय मंडलिक व प्रकाश आबीटकर. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)


विमानतळ विस्तारीकरणासाठी जमिनीचा प्रश्‍न सोडवा

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; कोल्हापूरच्या नव्या टर्मिनल भवनचे मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्‍यक जमिनीचा प्रश्‍न मार्गी लावून, विविध विकासकामे लवकर पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. गेल्या ५० वर्षांत देशभरात ७४ विमानतळे होती; आता ही संख्या १५० वर गेली आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. मोदींमुळे प्रचंड वेगाने विकासकामे होत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विमानतळ नवीन टर्मिनलच्या उद्‌घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आझमगढ (उत्तरप्रदेश) येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोल्हापूरसह देशभरातील पंधरा नवीन विमानतळ टर्मिनल भवनचे ऑनलाईन उद्‌घाटन झाले. यावेळी कोल्हापुरातील नव्या टर्मिनलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार अमल महाडिक, शाहू ग्रुपचे अध्यक्ष सरमजित घाटगे, नागरी उड्डाण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पियूष श्रीवास्तव, दिलीप सजनानी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक अनिल शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘कोल्हापूरच्या ऐतिहासिक व पारंपरिक वारशाचे दर्शन घडविणारा लूक कोल्हापूर विमानतळाला आला आहे. विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्याबाबत लवकर प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच विविध विकासकामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या विमानतळामुळे कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती मिळेल.’
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणारी जमीन खासगी तत्त्वावर देण्यास शेतकरी तयार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला आदेश दिल्यास हा प्रश्‍न लगेच मार्गी लागू शकतो. तसेच दोन दिवसांत कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना करू.’ खासदार महाडिक म्हणाले, ‘विमानतळाच्या उद्‌घाटनामुळे आपले व कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेचा लूक या विमानतळाला मिळाला आहे. आता दोन दिवसांत ‘वंदे भारत’ सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत.’
खासदार माने म्हणाले, ‘आम्ही तिन्ही खासदारांनी एकमेकांच्या आडवे न येता एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची भूमिका घेतली आहे. आमच्यात स्पर्धा कोल्हापूरला पुढे नेण्याची असून, कोणालाही मागे खेचण्याची नाही.’ खासदार मंडलिक म्हणाले, ‘कोल्हापूर विमानतळ येथून २०१९ पासून सुमारे पाच लाख प्रवासी ये-जा करत आहेत. आता आमच्या सामुदायिक प्रयत्नाने सुसज्ज विमानतळ झाले आहे. विमानतळासाठी यापूर्वीच्या पालकमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष मदत केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. उजळाईवाडी येथून शहराला जोडणारा रस्ता व्हावा, अशी मागणी असून, मुख्यमंत्र्यांनी ती मंजूर करावी.’
------------
कचरा उठावासाठी निधी देऊ : पालकमंत्री
उजळाईवाडीसह आसपासच्या गावांमध्ये कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची गरज आहे. कारण कचऱ्यामुळे पक्षी येऊन विमान उड्डाणावेळी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून लागेल तो निधी देऊ, अशी घोषणा पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केली.
---------
तिरुपती विमानसेवा ३१ पासून पुन्हा सुरू : महाडिक
सध्या बंद असलेली कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा येत्या ३१ मार्चपासून पुन्हा सुरू होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. तसेच एक वर्षात कोल्हापूर विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com