इचल : मुख्यमंत्री दौरा विश्लेषण

इचल : मुख्यमंत्री दौरा विश्लेषण

घोषणेची अंमलबजावणी महत्त्‍वाची
मुख्यमंत्री दौऱ्याचे फलीत ः यंत्रमाग अतिरिक्त वीजदर सवलतीचा प्रश्न
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० ः इचलकरंजीसाठी भरपूर काही देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा दौरा फलदायी ठरला असला तरी त्यांनी केलेल्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यामध्ये यंत्रमागधारकांसाठी अतिरिक्त वीज सवलतीचा प्रश्न महत्त्‍वाचा आहे. यापूर्वी अनेकवेळा शासनपातळीवर निर्णय झाला, घोषणा झाली. पण त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी यापुढे शासनाची असणार आहे.
शासनाच्या महिला सशक्तीकरण अभियानाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आले होते. यावेळी ते इचलकरंजी शहरासाठी विविध घोषणा करणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी यंत्रमागधारकांच्या अतिरिक्त वीज सवलतीच्या मागणीला हात घातला. साध्या यंत्रमागाला १ रुपये व २७ अश्वशक्तीवरील स्वंयचलित यंत्रमागाला ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे.
पण याबाबतचा पुर्वानूभव यंत्रमागधारकांना वाईट आहे. या दोन्ही घोषणा शासन पातळीवरून यापूर्वी झाल्या आहेत. दोन वेगवेगळ्या शासनाच्या कालावधीत या घोषणा करण्यात आल्या. पण त्याची आजअखेर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे यंत्रमागधारकांचा शासनाच्या घोषणांवरील विश्वासच उडाला आहे. किंबहुना शासनाच्या अशा सवलतीच्या घोषणांमुळे यंत्रमागधारकांत खुशी निर्माण होण्याची परिस्थितीच राहिलेली नाही.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आता याबाबतची नव्याने घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी होणार काय, याकडे आता विशेष लक्ष असणार आहे. समोर लोकसभा निवडणूक आहे. थोड्या कालावधीनंतर विधानसभा निवडणूक लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या घोषणांची प्रत्यक्षात कार्यवाही शासन पातळीवर करावीच लागणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींचाही मोठा कस लागणार आहे.
...
रस्त्यांसाठी निधी आवश्यकच
मुख्यमंत्री शिंदे यांनी इचलकरंजीतील रस्त्यांसाठी १०० कोटी निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यांची ही घोषणा खूपच महत्त्‍वाची आहे. पुढील काळात शहरातील रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. शहरातील अंतर्गत रस्ते खराब होत आहेत. महापालिकेचे महसुली उत्पन्न पाहता रस्त्यांसाठी विशेष निधीची गरज होती.
...
‘आतापर्यंत केवळ शासनाकडून घोषणाच करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र झालेली नाही. यंत्रमागधारकांना सवलतीचे गाजर दाखविण्याचे काम केले जात आहे. त्याला आता यंत्रमागधारकांनी भुलू नये.
-विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com