अहिल्यादेवी स्मारक

अहिल्यादेवी स्मारक

७०४०६, ७०४०५, ४०८, ४०९

विकासाचे ध्येय असणाऱ्या नेतृत्वास बळ द्या

सचिन पायलट ः अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण

कोल्हापूर, ता. १० ः समृद्ध व समाधानी समाज बनवण्यासाठी सशक्त नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी समाजाला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा तसेच विकासाचे ध्येय असणाऱ्या नेतृत्वाला समाजाने बळ दिले पाहिजे. तरच समाजाची प्रगती होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार सचिन पायलट यांनी केले.
आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका व समस्त धनगर समाजाने साकारलेल्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण रविवारी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. आमदार पायलट म्हणाले, ‘समाजाची एकजूट राखण्याचे काम त्यावेळी अहिल्यादेवींनी केले आहे. सर्वत्र पुरूष राजे असताना महिलेने नेतृत्व करताना अनेक आव्हाने होती. मात्र विनम्रपणे, विविध योजना राबवत न्यायाचे राज्य चालवण्याचे काम करून स्त्रीशक्ती काय करू शकते हे त्यांनी दाखवून दिले. अहिल्यादेवींचे साकारलेले स्मारक साऱ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्यासमोर असलेली आव्हाने आजही महिलांसमोर कायम आहेत. अशा स्थितीत समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या नेतृत्वाला पुढे नेण्याची गरज आहे. त्यासाठी संविधानाने दिलेल्या मताचा अधिकाराचा वापर करा. मताची किंमत समजली पाहिजे. आपला, तुमचा असे न करता सर्व समाजाला सोबत घेऊन जाणाऱ्यांना साथ दिली पाहिजे. समाजाला नवीन विचार देणारा, प्रगतीचे मार्ग दाखवणाऱ्यांना बळ दिले पाहिजे. तरच संपूर्ण समाजाला प्रगती साधता येणार आहे. त्यासाठी एकजूट महत्वाची आहे. गरीब, शेतकरी, मजुरांची मुले जोपर्यंत निर्णय घेणाऱ्यांच्या खुर्चीवर बसत नाहीत. तोपर्यंत देशचा विकास होणार नाही.’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘लोकसभेच्या जागांसाठी कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला या कार्यक्रमासाठी गेलो नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज व धनगर समाजाचे जुने ऋणानुबंध आहेत. त्याच धनगर समाजाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आता श्रीमंत शाहू महाराजांनी भुषवले आहे. त्यामुळे भविष्‍यात या समाजाशी असलेले ऋणानुबंध आणखी घट्ट होतील. आठ दिवसांत ढोल वाजणार आहेत, भंडारा उधळायचा आहे. घोंगडे, काठी हाती घेऊन विचारांची लढाई विचाराने लढण्याचे काम करूया. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी कोल्हापूरच्या नवीन खासदारांच्या फंडातून करू.’
शाहू महाराज म्हणाले, ‘धनगर समाजाला न्याय मिळवून दिला जाईल. एकजुटीने प्रश्‍न हाताळला तर ताकद निर्माण होऊन हात मजबूत होतो.’ माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले, ‘आठवड्यात आरक्षण देऊ म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून राजकारण सुरू आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील मराठा, मुस्लिम समाजाने तेढ निर्माण होणार नाही यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.’ आमदार डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले, ‘राजकीय स्वार्थापोटी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार कृतीत आणण्याची वेळ आहे. आरक्षणासाठी मराठा व धनगर खांद्याला खांदा लावून उभे आहेत. अफवांना बळी पडू नका.’
यावेळी डॉ. आण्णासाहेब डांगे, आमदार ऋतुराज पाटील, रामहरी रुपनवर, मनिषा डांगे यांचीही भाषणे झाली. बयाजी शेळके यांनी स्वागत केले. बबनराव रानगे यांनी प्रास्ताविक केले. बाबुराव बोडके यांनी आभार मानले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, व्ही. बी. पाटील, विजय देवणे, संजय घाटगे, अरूण डोंगळे, विश्‍वास पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राची सूत्रे कोल्हापूरकडे हवी असतील तर...
कोल्हापुरात आल्यानंतर राज्यात सरकार कोणाचे आहे याचा विसर पडतो. जिकडे तिकडे सतेज पाटील जाणवते, असे सांगत माजी मंत्री देशमुख म्हणाले, ‘महाराष्ट्राची सुत्रे कोल्हापूरकडे हवी असतील तर सतेज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा. कॉंग्रेसचे खासदार, आमदार बहुमताने निवडून द्या. पी. एन. पाटील एव्हरग्रीन आहेतच. मालोजीराजेंनाही विधानसभेत आणा.

महाराज वेळ आली आहे...
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने बोलताना माजी मंत्री अमित देशमुख श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना म्हणाले, ‘महाराज वेळ आली असून, आता कोल्हापूरचा आवाज दिल्लीत घुमला पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्रवासीयांच्यावतीने विनंती करत आहे. श्रीमंत शाहू महाराजांनी आता पुढे आले पाहिजे. त्याची चर्चा सुरू होताच लातूर, सांगलीमध्ये सकारात्मक पडसाद उमटत आहेत. भविष्यात देशाचे नेतृत्व इंडिया आघाडीकडे येणार असल्याने त्यात शाहू महाराज व सचिन पायलट यांची भूमिका महत्वाची असेल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com