''लिव्ह इन रिलेशन''वरुन वाद; आई-भावाच्या मारहाणीत तरूणीचा मृत्यू

''लिव्ह इन रिलेशन''वरुन वाद; आई-भावाच्या मारहाणीत तरूणीचा मृत्यू

फोटोः KOP24M75292 मृत वैष्णवी पोवार
KOP24M75336 शुभांगी पोवार
KOP24M75337 श्रीधर पोवार
KOP24M75338 संतोष आडसुळ

''लिव्ह इन रिलेशन'' वादातून
तरुणीचा खून; आई, भावांवर गुन्हा
कुटुंब शनिवार पेठेतील; तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : ''लिव्ह इन रिलेशन''मध्ये राहण्याच्या वादातून आई-भावाने बेदम मारहाण करत उच्चशिक्षित मुलीचा आज खून केला. वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा. केदारलिंग प्लाझा, शनिवार पेठ पोस्टाजवळ) असे तिचे नाव आहे. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे नातेवाइकाच्या घरी नेऊन तिला रात्रभर काठी, गजाने मारहाण करण्यात आली. तिला जखमी अवस्थेत गुरुवारी सकाळी रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आई शुभांगी, लहान भाऊ श्रीधर आणि मानलेला भाऊ संतोष आडसूळ या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवार कुटुंबीयांचा चप्पल विक्रीचा पारंपरिक व्यवसाय आहे. पापाची तिकटी चप्पल लाईन येथे त्यांचे ‘व्हरायटी लेदर’ दुकान आहे. लक्ष्मीकांत पोवार यांच्या मृत्यूनंतर शुभांगी व्यवसाय पाहत होत्या. त्यांना मुलगा श्रीधर मदत करत होता. मुलगी वैष्णवी एका बॅंकेत नोकरीला होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच तिने नोकरी सोडली. ती पुण्यात एका मित्रासोबत राहत असल्याचे आईला समजले. याविषयी त्यांनी विचारणा केली होती. वैष्णवीने संबंधित मित्रासोबत ''लिव्ह इन रिलेशन''मध्ये राहणार असल्याचे आईला सांगितले. मात्र, मुलीचे हे विचार न पटल्याने त्यांच्यात सहा महिन्यांपूर्वी वाद झाला होता.

साखरपुड्यानंतर पुन्हा नकार
वैष्णवीची आणि तिच्या मित्राची समजूत काढून तिला लग्नासाठी तयार केले. चार महिन्यांपूर्वी तिचा साखरपुडा उरकण्यात आला होता; परंतु तिने लग्नास नकार देत मित्रासोबत ''लिव्ह इन रिलेशन''मध्ये राहणार असल्याचे आईला सांगितले. यामुळे पुन्हा त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली होती.

लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
वैष्णवीचा पुण्यातील मित्र ‘एम. आर.’ म्हणून काम करतो. दोघांमध्ये पुन्हा चर्चा करून वेगवेगळे होण्यासाठी वैष्णवीला घेऊन आई, भाऊ पुण्याला बुधवारी गेले होते; परंतु पुन्हा वादावादी झाल्याने आज कोल्हापूरला परत येण्यास निघाले. आईने आणि भावांनी तिला पन्हाळा तालुक्यातील नातवाइकांच्या घरी नेऊन रात्रभर मारहाण केली. जखमी अवस्थेतच तिला कोल्हापूरला आणण्यात आले. मारहाणीमुळे तिच्या शरीरावर रक्त साकळल्याने ती रात्रभर विव्हळत होती. हातावर, पायावर, पाठीवर गंभीर दुखापत झाली. गुरुवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने वैष्णवी बेशुद्ध झाली. यानंतर तिला दसरा चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मनमिळावू वैष्णवी
वैष्णवी मनमिळावू होती. शहरातील एका ढोल-ताशा पथकाची सदस्य होती. तिचा मित्र परिवारही मोठा आहे. वैचारिक मतभेदातून तिचा मृत्यू झाल्याने मित्र परिवाराला धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आई, भावाला अटक केल्याने नातेवाईक, मित्र परिवारालाच तिच्या अंत्यसंस्कारांची तयारी करावी लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com