हातकणंगले तालुका दौरा

हातकणंगले तालुका दौरा

79866
शिरोली : सगळे एकाच माळेतले मनी..., असं म्हणत महिला भाजी-भाकरीचं गाठोडं डोक्यावर घेऊन भांगलणीच्या कामाला निघाल्या.

79870
हुपरी : येथे प्रचार पत्रके वाटप करताना ज्येष्ठ कार्यकर्ते.

फिरस्ता बातमीदार
सुनील पाटील
हातकणंगले विधानसभा मतदारसंघ

फोडाफोडीने पालटला नूर, तरुण प्रचारापासून दूर
मतदान करणार पण सक्रिय नाही; नेता म्हणेल ती पूर्व दिशा याला बगल
हातकणंगलेत लोकसभेची हायव्‍होल्टेज निवडणूक होत आहे. महायुती, महाविकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडीसह २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक कोणतीही असो, हातकणंगले तालुक्यातील राजकारण हे गटातटाचे पाहायला मिळते. प्रत्येक गाव अन् गाव आपल्या नेत्याला किंवा नेत्याने पाठिंबा दिलेल्या पक्षाला विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आणि प्रचार करताना दिसत असे. यंदाच्या निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. नेता म्हणेल ती पूर्व दिशा याला बगल मिळत आहे. राजकीय पक्षांमधील फोडाफोडी, नेत्यांच्या सोयीच्या भूमिका, यात विनाकारण भरडणारा कार्यकर्ता विविध पक्ष, संघटनेच्या प्रचारापासून चार हात लांबच राहिलेला दिसून येत आहे. सकाळी आठ ते सायंकाळपर्यंत या हातकणंगले तालुक्यातील महत्त्‍वाच्या गावातील हे चित्र.
-----------------
सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पुलाच्या शिरोलीत प्रवेश केला. सकाळी-सकाळी प्रत्येक जण कामात गुंतलेला. काही महिला भाजी-भाकरीचे गाठोडं डोक्यावर घेऊन भांगलणीच्या कामाला निघाल्या होत्या. दरम्यान, पुढच्या महिन्यात होणाऱ्या मतदानाबद्दल विचारले असता यातीलच एक मावशी म्हणाल्या, ‘मतदान करायला जाणार की, खरं कोणाला मतदान करायचं? निवडून येणारे सर्वजण एकाच माळेचं मणी आहेत. आमची कामं करायला कोण येणार नाही. ऊन्‍ह वाढायच्या आधीच आम्ही आमचं काम करून आल्याशिवाय निर्वा नाही.’ असे म्हणत त्यांनी अधिक गतीने पावलं टाकायला सुरुवात केली. याचवेळी या गावात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा फलक लागलेला दिसला नाही. कोणीही सकाळी-सकाळी प्रचाराच्या घाईत असलेलेही दिसले नाहीत. अर्धातास फिरल्यानंतर पेठवडगाव, भेंडवडे, खोचीकडे निघालो. पेठवडगावमध्येही कोणत्याही उमेदवाराचे फलक, झेंडे दिसले नाहीत. याठिकाणी बसस्थानकाजवळ महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी सज्ज असलेल्या चार रिक्षा तैनात होत्या. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचार कार्यालयाबाहेरही एक-दोघे जण प्रचारासाठी काढलेल्या पत्रिकांची जुळवाजुळव करताना दिसले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडून महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते प्रचाराची तयारी करताना दिसून आले. त्यानंतर भेंडवडे गावाकडे आमचा मोर्चा वळवला. काही वेळाने भेंडवडे येथे आल्यानंतर खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्या गटात कार्यकर्त्यांची र्इर्ष्‍या असल्याचे काही तरुणांनी सांगितले. मात्र, प्रचारासाठी कोणीही फिरत नसल्याचे चित्र होते.
दुपारनंतर हळूहळू उन्हाचा तडाखा वाढत होता. तसा गावागावांमध्ये शुकशुकाट होता. उसाला पाणी देऊन काही शेतकरी झाडाच्या सावलीत बसले होते. दरम्यान, कुंभोज-बाहुबली रस्त्यावर काही तरुण चर्चा करीत उभे होते. चहा-नास्त्यासाठी तिथे थांबलो. यावेळी राजकीय पक्षांमधील फाटाफूट, प्रत्येक नेता स्वार्थ पाहतो. विकासाचा मुद्दा बोलणार कोण आणि अमलात आणणार कोण? अशीच चर्चा सुरू होती. त्या तरुणांना काही प्रश्‍न विचारले. यामध्ये आम्ही ७ मे रोजी मतदान करायला नक्की जाणा; मात्र कोणाचा प्रचार करण्यासाठी जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
-----------------
चौकट
कोणाला दुखवण्यापेक्षा प्रचार नको
एकाच पक्षातील दोन गट झाले. दोन्ही गटा''तील कार्यकर्त्यांसोबतचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे कोणाला दुखवण्यापेक्षा प्रचार नको म्हणूनच आम्ही आमच्या कामात गुंतलेलो असतो. अशीच भूमिका त्या तरुणांनी घेतली. येवढेच नव्हे तर एखादा प्रचार कार्यालयातून प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांचे फोन आले तर ते ही टाळत असल्याचे सांगितले.
-----------------
येथे प्रचार थंडच...
चंदूर, अंबप, हालोंडी, इंगळी, हातकणंगले, मजले, हुपरीसह इतर गावांमध्येही सायंकाळपर्यंतचा प्रचार थंडच होता. त्यामुळे लोकसभेची निवडणूक आहे, असे चित्र दिसले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com