फड मतदारांचा

फड मतदारांचा

फोटो-80579

लोगो
फड मतदारांचा
- नंदिनी नरेवाडी

‘त्या त्या’ उमेदवाराचं वारं हाय, आताच सांगता यायचं नाय
भाजी मंडईतील चर्चेचा सूर ः गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर भाष्य

सायंकाळी चारची वेळ. साऱ्या कपिलतीर्थ मंडईला गिऱ्हाईकांची प्रतीक्षा. ऊन कमी झाल्यानंतर भाजी घ्यायला ग्राहक येतील, अशी विक्रेत्यांची आशा. यातच क्वचित दोन-तीन अशा संख्येने येणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे येण्यासाठी विक्रेते क्लृप्त्या लढवतात. घ्या वांगी, काकडी, दोडका अशा हाकाऱ्या देतात. सध्या काकडीचा दर उतरला आहे. विक्रेत्यांच्या गाठीला पैसे उरेनात. त्यातच एका विक्रेत्याने आरोळी ठोकली घ्या, २५ ला किलो काकडी. लगेचच दुसऱ्या विक्रेत्याचा चेहरा पडला आणि तोही मोठ्याने म्हणाला, ‘घ्या फुकट, मोदी आल्यानंतर भाजीपण फुकट...’ दुपारच्या निवांत क्षणी राजकारणातून रंगलेली चर्चा ग्राहकांना मात्र गोंधळात टाकून गेली.
----

मतदानाची तारीख जवळ येईल, तशी प्रचारात रंगत वाढू लागली आहे. त्यातच निवडणुकीची चर्चा गल्लीबोळात-कट्ट्यावर बारीक आवाजात का असेना, सुरू आहे. यातही नेहमी गजबजलेली भाजी मंडई कशी मागे पडेल? सकाळी-संध्याकाळी भाजी खरेदीसाठी मंडईत ग्राहकांची गर्दी होते; मात्र दुपारच्या सत्रात कोणीही मंडईकडे फिरकत नाही. ग्रामीण भागातून आलेल्या विक्रेत्यांना घरी येऊन-जाऊन परवडत नाही. अशावेळी राजकारणावर चर्चा रंगते. अगदी गल्लीपासून दिल्‍लीपर्यंतच समीकरणे मांडली जातात. याचाच धांडोळा घेण्यासाठी शहरातील भाजी मंडयांमध्ये फेरफटका मारला.
सुरूवातीलाच कपिलतीर्थ मार्केटमध्ये एकूणच देशाच्या राजकारणावर चर्चा सुरू होती. ‘तिसऱ्यांदा पुन्हा मोदींचीच सत्ता येणार बघ. त्यांच्या सरकारने कोरोना काळात शेतकरी, फेरीवाले, महिलांच्या खात्यावर पैसे पाठवले. त्याची किती मदत झाली. त्यामुळे यंदा पण त्यांचीच सत्ता येणार’, असे एकाने सांगितले. दुसऱ्या विक्रेत्याने मात्र त्याला खोडून काढत ‘पैसे पाठवले म्हणून मतदान फिरत नाही. उलट लोकांना बसून खायची सवय लागते. त्यापेक्षा हाताला काम दिले पाहिजे.’ असा सूर ओढला. ही चर्चा ऐकत असणाऱ्या एका आजींनी ‘तुम्ही भांडू नका, त्यांच्यापायी तुमचे वाद नकोत’, असा सल्ला दिला. तसा चर्चेला ब्रेक लागला.
सायंकाळच्या वेळी गजबजणाऱ्या रेल्वे फाटकाजवळील भाजी मंडईत पोहोचलो. ग्रामीण भागातून वांगी, गवारी, काकडी घेऊन काही शेतकरी आले होते. त्यांची हातकणंगले मतदारसंघातील लढाईबाबत चर्चा रंगलेली. ज्याच्या त्याच्या भागात ‘त्या त्या उमेदवाराचं’ वारं हाय. आताच कोणाचं सांगता यायचं नाई, एकाने सांगितले. त्याला उत्तर देत दुसरा म्हणाला, ‘शेट्टींनी उसाला भाव मिळवून दिला म्हणून शेतकऱ्याचं जगणं सुधारलंय.. नाहीतर कुठलं सरकार मालाला भाव देतंय. शेट्टी निवडणुकीत पैसा वाटत नाहीत. उलट शेतकरीच त्यांना वर्गणी काढून निवडणुकीसाठी उभं करत्यात. साहेबांची इनोव्हा माहीत हाय नव्हं शेतकऱ्यांनी दिलेली.’ अशी आठवण करून दिली. तोवर शाहूवाडीत पण आबा चर्चेत हाईत आणि इचलकरंजीत मानेंना लीड मिळणार बघ, लिहून घे असे म्हणत तिसऱ्याने चर्चेत उडी घेतली. मग कोल्हापुरात काय होणार? मी त्यांची दिशा कोल्हापुरात वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मात्र कोल्हापुरात काय सांगता यायचं नाही. वातावरण टाईट हाय आणि फाईट पण जोरदार होणार हाय... असे सांगत कोल्हापुरातील लढाईचे चित्र मांडले.

चौकट
ग्राहकांकडूनही कौल जाणून घेण्याचा प्रयत्न
नेहमी येणाऱ्या ग्राहकासोबत विक्रेत्यांचे एक वेगळेच नाते तयार झाले आहे. त्यातूनच अगदी घरगुती चर्चाही रंगतात. कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली जाते. ख्याली खुशाली विचारत चर्चेला सुरूवात होते. त्यातूनच तुमच्या भागात कोण आघाडीवर हाय, म्हणत कौल विचारला जातो. त्यातूनही ग्राहक आणि विक्रेत्यांच्यात राजकारणावर चर्चेला सुरूवात होते.

चौकट
काही ठिकाणी राजकीय चर्चेला बगल
काही ठिकाणी मात्र आपल्याला भाजी विकायची आहे, चार पैसे कमवायचे आहेत, राजकारणातील चर्चेत वेळ घालवायचा नाही, त्यातून वादही नकोत, असे सांगत काही भाजी विक्रेत्यांनी राजकीय चर्चेला बगल दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com