आमच्या भागातलं आबा हायतं पण...

आमच्या भागातलं आबा हायतं पण...

फोटो
80467
-
80468


फिरस्ता बातमीदार
- संतोष मिठारी
शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ

आबा हायत; पण तेवढं सोप्पंबी नाय...
सरुड, बांबवडे, मलकापुरात प्रचाराचा माहौल; धनगरवाड्यांवर कुणी फिरकलंच नाही

रविवारी सकाळी शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला. वाघबिळातून पुढे बोरपाडळेत पोहोचलो. तिथल्या छत्रपती शिवाजी ग्रुपजवळील एका बाकड्यावर चार शेतकऱ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यांना विचारलं कसं वातावरण हाय? ‘आबा आमच्या भागातील असल्यानी यंदाच्या टाइमाला ते साधणार हायती’ असं उत्तर त्यातील एका आजोबांनी दिलं. त्याला व्हय व्हय म्हणत एकाने दुजोरा दिला; पण सावकारांची मानेंना असलेली साथ आणि शेतकऱ्यांच्या ताकदीवर लढणाऱ्या शेट्टींमुळे तुम्हाला वाटतंय तेवढं आबांना सोप्प नसल्याचं तिसऱ्यानं सांगितलं. तेथून नावली, पैजारवाडी, खुटाळवाडी मार्गावर जाताना आम्हाला मका, भुईमूग, भात उन्हात घालण्यासह पापडसह इतर वाळवण अशी मान्सूनपूर्व कामे करण्यात महिला गुंतल्याचे दिसून आलं.
------

मका, उसाच्या हिरव्यागार पट्ट्यातून कडवी नदी पुलावरून पुढे जाताना स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या ऊस दराच्या लढ्याची माहिती देत प्रचार करणारी व्हॅन आमच्या पाठोपाठच महायुतीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांच्या सरुडच्या चौकात आली. तेथे पारावर विश्रांती घेत असलेल्या तीन-चार गावकऱ्यांच्या नजरा स्पीकर वाजत असलेल्या व्हॅनच्या दिशेने वळल्या. त्यांना मी पुन्हा वातावरण कुणाचं असं विचारलं. त्यांनी फक्त आबांचंच, इतक्या दोनच शब्दांत उत्तर दिलं. गावातून एक फेरी मारत आमदार गल्लीतील सत्यजित पाटील यांच्या निवासस्थानासमोर आलो, तर तिथं अगदी शांत वातावरण होतं.
वडगाव थोरातांचे, सौते, शिरगाव करत मलकापूर बसस्थानकावरून फेरी मारून येळाणीत आलो, तर तिथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात पदयात्रा संपवून आलेले काही कार्यकर्ते विश्रांती घेत होते, तर काहींचे पुढील प्रचाराचे नियोजन सुरू होते. मलकापुरातून माणच्या धनगरवाड्याकडे जाण्यासाठी उचतच्या दिशेने निघालो. मलकापूर, बांबवडे, परळे परिसरात लग्नांची धामधूम सुरू होती. या रस्त्यावरून जाताना म्हाळसवडे धनगरवाड्याचं नाव पुसट झालेला फलक दिसला आणि त्याच्या दिशेने चारचाकी वळविली. बऱ्यापैकी चांगला डांबरी रस्ता असल्यानं जरा समाधान वाटलं; पण ते काही क्षणापुरते राहिलं. कारण पुढं अगदी खडकाळ वाट दिसली. चारचाकी तिथंच थांबवून चालत धनगरवाडा गाठला. तिथल्या एका घराच्या अंगणात बसलेल्या आजीनं हाक मारली आणि अरे तांब्या भरून पाणी आणा, असं घरतल्यांना सांगितलं. पाणी पिऊन झाल्यावर प्रचाराला कुणी आलतं काय? असा प्रश्न आजींना केला, त्याला कुणी नाही बाबा असं त्यांनी उत्तर देत असतानाच त्यांचा शेतकरी मुलगा बाहेर आला.
आजी शेजारी बसत त्यांनी तीन महिन्यांपूर्वी राजू शेट्टींनी एक फेरी मारली; पण आता कुणी फिरकलेलं नाही. आता नेते-कार्यकर्ते येतील. अमूक-तमूक करतो म्हणतील. मते पदरात पाडून घेतील आणि पुन्हा पाच वर्षांनी येतील, असं सांगत पिण्याच्या पाण्यापासूनच्या विविध अडचणींचा त्यांनी पाढा वाचला. चांगली विहीर वर्षभरापूर्वी इस्कटून नवी बांधली लेका; पण त्याचं अजून उद्‌घाटन केलेले नाही. त्यामुळे डबक्यातलं पाणी प्यायला घेऊन जावं लागतंय, असं दुखणं त्यांनी सांगितले. अडचणी वर्षानुवर्षे सुटत नसल्या, तरी आम्ही मतदान काय चुकवित नाही ते करतोच, असं त्यांना आवर्जून सांगितलं. तेथून घाट रस्ता संपवून येळवण जुगाईत आलो. तिथल्या एका सारवलेल्या घराच्या अंगणात चार-पाच तरुणांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागत तिथंच बसलो आणि इलेक्शनचे वारे कुणाच्या बाजूने, काय होईल, असा प्रश्न केला. माजी खासदार संभाजीराजेंनी आमचं गाव दत्तक घेतलं. त्यांनी रस्ते, गटर्स या सुविधा चांगल्या केल्या. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न जो सोडवल त्याला आम्ही साथ देण्याचा विचार करतोय. याआधी तालुक्यानं शेट्टी-मानेंना खासदारकी, तर आबांना आमदारकीला साथ दिली. आता तिघेपण एकाच आखाड्यात उतरल्यात, त्यामुळे लढत रंगत असून, कौल कुणाकडं हे लगेच सांगता येणार नसल्याचे या तरुणांनी सांगितलं. जुगाई देवीचं दर्शन घेऊन अणुस्कुरामध्ये पोहोचलो. उमेदवार नाहीत; पण कार्यकर्तेही आमच्या गावासह परिसरातील धनगरवाड्यात क्वचितच फेरी मारत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. तेथून पावनखिंड, विशाळगड, गजापूर या निसर्गरम्य मार्गाने आंबा येथे पोहोचलो. या मार्गावर प्रचाराचे वातावरण नव्हते. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास आंब्यात रविवारच्या बाजारातील गर्दीतून बाहेर पडत कोल्हापूरची वाट धरली.
........
चौकट
व्हयं लेका मतदान करणार की...
सौतेमधून मलकापुराकडे अकराच्या सुमारास जाताना ओढ्यावरील एका झाडाच्या सावलीत शिरगावमधील तीन शेतमजूर महिला थांबल्या होत्या. त्यांना विचारलं, मावशी इलेक्शन सुरू हाय, कोण उभा राहिलंय. आमच्या भागातील आबा आणि राजू शेट्टी हायत की असं एक मावशी सांगत असताना दुसरीनं तिला अगं काल ते आणखी एकाची धनुष्यबाणाची जाहिरात घरात आलीया की.... असं सांगत तिसऱ्या उमेदवाराची आठवण करून दिली. प्रचाराच्या मोटारी बी लयं फिराल्यात, असंही सांगितलं. मतदान करणार नव्हं, असं विचारताच व्हय लेका असं म्हणत त्या तिघींनी डोक्यावर पदर घेत शिरगावची वाट धरली.
.......
चौकट
सावकरांची ताकद अन् वातावरण टाईट
डोणोलीतून बांबवडेमध्ये आलो. तिथल्या स्टॉपवर मलकापूरला साखरपुड्यासाठी जायला थांबलेल्या काकांना कुणाचा जोर हाय, असं विचारताच आता तर उन्हाचाच हाय, असं हसत उत्तर दिलं आणि मशाल, धनुष्यबाण लढत होईल, असे ते सांगत असतानाच त्यांची एसटी आली आणि ते पुढच्या प्रवासाला निघून गेले. स्टॉपच्या समोर असलेल्या फुलांच्या हार विक्रेत्याच्या स्टॉलवर गर्दी दिसली. हार कसा दिला म्हणत जोर कुणाचा हाय, असं विचारत सहज खडा टाकला. त्यावर गर्दीतील दोघांनी एकदमच आमच्या भागातलं आबा हायतं त्यांनी जोर लावलाय; पण सावकरांची ताकद मानेंच्या बाजूला असल्यानं वातावरण टाईट झालंय, असं सांगत वातावरणाचा अगदी सहजच अंदाज व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com