जोडरस्ता डांबरीकरणाला मुहूर्त नाहीच

जोडरस्ता डांबरीकरणाला मुहूर्त नाहीच

GAD295.JPG
80583
दुंडगे ः जरळीकडे जाणाऱ्या जोडरस्त्याचे डांबरीकरण दीड महिन्यापासून प्रलंबित आहे. परिणामी खडीवरून वाहने घसरून अपघात होत आहेत. (छायाचित्र ः संजय धनगर)
----------------------------------------------
जोडरस्ता डांबरीकरणाला मुहूर्त नाहीच
दुंडगे-जरळी रस्ता ः खडीमुळे घसरताहेत वाहने, किरकोळ अपघात वाढले
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ ः दुंडगे-जरळी जोडरस्त्याचे शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी जरळी पंचक्रोशीतील नागरिकांना अजून किती संघर्ष करावा लागणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. रूंदीकरणापासून सुरू झालेला संघर्ष आता डांबरीकरणासाठीही करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. दीड महिना उलटला तरी अद्याप या जोडरस्त्याचे डांबरीकरण नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
नूल, खमलेहट्टी, शिंदेवाडी, मुगळी गावांना जाण्यासाठी सोयीचा रस्ता म्हणून दुंडगे-जरळीवरून जाणाऱ्या मार्गाकडे पाहिले जाते. यामुळे या मार्गावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. संकेश्वर-आंबोली महामार्गावरील दुंडगेतून जरळीकडे जोडरस्ता जातो. या भागातील महामार्गाचे काम संपून सहा महिने झाले. तेव्हापासून जरळी जोडरस्त्याकडे महामार्ग व्यवस्थापनाचे दुर्लक्षच आहे. सुरुवातीला हा जोडरस्ता केवळ खडक टाकून सुरू केला. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा आला. उसाची वाहने तर जादा ट्रॅक्टर लावून ओढून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. वाहने घसरत होती. त्यानंतर जोडरस्त्यालगच गटारीचे काम केल्याने रस्ता अरूंद झाला. एसटीसह अवजड वाहने वळण्यात समस्या येऊ लागली.
परिणामी ग्रामपंचायतीने आक्षेप घेतल्यानंतर रस्ता रूंद करून देण्याची ग्वाही दिली. तरीसुद्धा तसेच काम सुरू केल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी एकत्र येऊन काम बंद पाडले. मग महामार्ग प्रशासनाला जाग आली आणि अवजड वाहने वळतील अशा पद्धतीने जोडरस्त्याचे रूंदीकरण केले. त्यावेळी भराव टाकून त्यावर खडी पसरली. आठ-पंधरा दिवसांत डांबरीकरण करून देण्याची ग्वाही दिली होती. मात्र, दीड महिना उलटला तरी अद्याप त्याचे डांबरीकरण केलेले नाही. यामुळे पसरलेली खडी एका ठिकाणी गोळा होऊन वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. वाहने घसरून छोटे अपघातही होऊन काहीजण जखमीही झाले, परंतु अद्याप महामार्ग प्रशासन जागे झालेले नाही. दुंडगा पूल व या जोडरस्त्याचे एकाचवेळी डांबरीकरण करणार असल्याचे सांगितले गेले, मात्र पूल आणि या रस्त्याच्याही डांबरीकरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
-------------
एसटीसेवेकडेही दुर्लक्ष
तालुक्यात चांगल्या ‘अर्निंग’ची फेरी म्हणून गडहिंग्लज-जरळी बंधारामार्गे नूल बसफेरीची ओळख होती. महामार्गाचे काम सुरू झाले आणि या फेरीला ग्रहण लागले. आधी महामार्गाचे काम, नंतर अरूंद रस्ता आणि आता डांबरीकरण नाही, अशी कारणे देत एसटी आगाराने अजूनही बससेवा पूर्ववत सुरू करण्याकडे डोळेझाक करीत आहे. भरपूर रूंदीकरण झालेल्या रस्त्यावरून मोठी अवजड वाहने जात आहेत, मग एसटीला काय अडचण आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मुळात ढिम्म एसटी प्रशासनाला नागरिकांच्या गैरसोयीशी काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसत असून, आता याप्रश्नी जरळी पंचक्रोशीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com