उमेदवारांसोबत एक दिवस लेख

उमेदवारांसोबत एक दिवस लेख

फोटो ः 80618
लोगो
उमेदवारासोबत
एक दिवस
- ओंकार धर्माधिकारी

विकासकामांची माहिती
अन् पैरा फेडण्‍याचे आवाहन

संजय मंडलिक यांचा दौरा; कार्यकर्त्यांकडून आढावा


रुईकर कॉलनीतील संजय मंडलिक यांच्या ‘लोकनेता’ या बंगल्यात सकाळी आठ वाजता युवा सेनेचे कार्यकर्ते प्रचाराचे नियोजन करत होते. एवढ्यात संजय मंडलिक गडबडीने खाली आले. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधल्यावर तातडीने गाडीमध्ये बसले. पाठीमागे त्यांचे स्वियसचिव होते. दिवसभराच्या कार्यक्रमांची पूर्वकल्पना मंडलिक यांना होतीच. त्याप्रमाणे त्या त्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करून काय निरोप द्यायचे, याच्या सूचना त्यांनी स्वियसचिवांना दिल्या. त्यानंतर मंडलिकांची पाच झेंडे समोर असणारी गाडी कागलच्या दिशेने धावली.
----

शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य भैया माने यांच्या घराजवळ पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते थांबले होते. मग मुश्रीफ आणि मंडलिक दोघेही एकाच गाडीतून म्हाकवेच्या दिशेने निघाले. वाटेत अप्पाचीवाडीत गाडी थांबली. मंत्री मुश्रीफ, मंडलिक दोघेही उतरले. तेथील हलसिद्धनाथाच्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येताना मंडलिक यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा पडला. विजयाच्या घोषणा आणि शुभेच्छा स्वीकारत मंडलिक प्रत्येकाची विचारपूस करत होते. कपाळाला भंडारा लावून मग मंडलिक आणि मुश्रीफांचा ताफा म्हाकव्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. गावामध्ये गाडी पोहोचताच कार्यकर्त्यांनी फटाके उडवून मंडलिक आणि मुश्रीफ यांचे स्वागत केले. मग हलगीच्या कडकडाटात कार्यकर्त्यांची छोटी रॅलीच गावातून निघाली. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन चौकातील सभेच्याठिकाणी मंडलिक आले. स्वागताचे औपचारिक सोहळे झाल्यावर मंडलिकांनी भाषणाला सुरुवात केली. उमेदवारीला झालेला उशीर, गावामधील विकासकामे, सहकारी पक्षांची साथ याचा आढावा घेऊन त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. मंत्री मुश्रीफ यांनी विधानसभेचा विचार करू नका, लोकसभेला मंडलिकांना पुन्हा दिल्लीत पाठवा, अशी भावनिक साद घातली. तेथून पुढची सभा बानगेत होती. गावात हरिनाम सप्ताह सुरू आहे. वारकऱ्यांना नमस्कार करून सभेच्या ठिकाणी मंडलिक आले. मंडलिकांनी पुन्हा पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाला दिलेली गती सांगितली. मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना शंभर टक्के मतदान देण्याचे आवाहन केले. मग पुढचे गाव म्हाळुंगे बुद्रुक आले. मंदिरातच सभा झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे गाडीमध्ये बसले. त्यांनी प्रचार कुठंपर्यंत आला आहे, कोणत्या गावात किती प्रतिसाद आहे, याची माहिती मंडलिकांना दिली. त्यानंतर बिद्रीत सभा झाली.
कार्यकर्त्याच्या घरी दुपारची विश्रांती घेऊन पुढे सावर्डे, बाचणीत सभा झाल्या. काही ज्येष्ठांनी तरुणांना खासदार सदाशिवराव मंडलिकांची आठवण करून दिली. सदाशिवराव मंडलिकांमुळे कालव्याचे पाणी या गावांना आले. पूर्वी पूजेसाठी ऊस मागून आणावा लागायचा. पण, कालव्याच्या पाण्यामुळे उसाचे भरघोस पीक येते. परिसरात साखर कारखाने निघाले. कौलारू घरे दुमजली झाली. शाळा, महाविद्यालये झाली. घराच्या आंगणात चारचाकी, दुचाकी गाड्या दिसू लागल्या. आता पैरा फेडायची आपली वेळ आहे. सदाशिवराव मंडलिकांचे ऋण मतातून फेडायचे आहे, हे सांगताना काहीजण भाऊक झाले. सायंकाळी कागलमध्ये संजय मंडलिकांच्या प्रचारार्थ सभा झाली. मंडलिकांच्या दोन पिढ्यांनी बाळगलेली सामाजिक बांधिलकी कार्यकर्त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाली. सभा संपल्यावर स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून संजय मंडलिक रात्री ११ वाजेपर्यंत घरी परतले. त्यानंतर उद्याचे नियोजन, दिवसभराचा आढावा घेतल्यावर प्रचाराचा एक दिवस मध्यरात्री अस्ताला गेला.

ठळक चौकट

प्रचारातील प्रमुख मुद्दे
- सुरू असणारे विकार प्रकल्प पूर्ण करणे
- जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा विकास
- औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती
- तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा
- केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी
------------------------------------
ठळक चौकट

दृष्टिक्षेपात दौरा...
- कडक उन्हामध्ये प्रचार
- कार्यकर्त्यांची विचारपूस
- गावातील देवळात जाऊन देवदर्शन
- तिन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समन्वय साधण्याचे आवाहन
- कागल तालुक्याच्या अस्मितेवर प्रचाराचा भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com