न

राजारामपुरी परिसरातील टाक्यांतून लवकरच पाणीपुरवठा
जूनपर्यंत ११ टाक्या, दोन संप हाऊस सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

कोल्हापूर, ता. ३० ः अमृत योजनेतून बांधलेल्या सायबर व राजारामपुरीतील नऊ नंबर शाळेजवळील पाण्याच्या टाकी पुढील आठवड्यात कार्यरत केल्या जाणार आहेत, तर जूनपर्यंत एकूण ११ टाकी व दोन संप हाऊस सुरू करण्याचे प्रयत्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहेत.
थेट पाईपलाईनला पूरक ठरण्यासाठी अमृत १ योजनेतून शहरात १२ टाकी बांधण्याबरोबरच वितरण नलिका बदलण्याचे काम सुरू होते. त्यासाठी बराच कालावधी गेला. राज्य सरकारकडून पाठपुरावा केल्यानंतर गेल्यावर्षीपासून कामांना गती आली आहे. त्यातून सायबर चौक व राजारामपुरीतील नऊ नंबर शाळेजवळील टाकीचे काम पूर्ण झाले. त्याची पाईप जोडणी झाली असून, दोन ते तीन दिवसांत या टाकी कार्यरत केल्या जाणार आहेत. त्यांच्यासह कदमवाडी, राजेंद्रनगर, कसबा बावडा उलपे मळा या टाकींचे कामही पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात त्याही कार्यरत होणार आहेत. १२ पैकी ११ टाकी, दोन संप हाऊसही जूनपर्यंत कार्यरत केले जाणार आहेत.
जूनपर्यंत सम्राटनगर, ताराबाई पार्क, बोंद्रेनगर, पुईखडी, शिवाजी पार्क, आपटेनगर या टाकींचे काम पूर्ण केले जाणार आहे. चंबुखडी टाकीला थेट पाईपलाईनचे पाणी देण्याचे काम पुढील आठवड्यात केले जाणार आहे. त्यामुळे सर्व शहराला ‘थेट’चे पाणी मिळणार असून, त्यावेळी या टाकींचा उपयोग करून योग्य दाबाने पाणी देण्याचे नियोजन आहे. तसेच तपोवन मैदानातील पाईपलाईनची गळतीही निवडणुकीनंतर हाती घेण्यात येणार आहे. यानंतर बहुतांश मोठ्या गळती दुरुस्त होणार आहेत. त्यातूनही पाणी मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.

चौकट
बायपासऐवजी टाकीतून पाणी
टाक्यांचे प्रमाण कमी, पाण्याची उपलब्धता कमी यामुळे ज्या टाकी होत्या त्यात पाणी व्यवस्थित भरल्या जात नव्हत्या. त्यातून योग्य पाणीपुरवठा होत नव्हता. त्याला पर्याय म्हणून टाकीतून देण्याऐवजी पाईपलाईनवरून बायपास पद्धतीने पाणी वितरण केले जात होते. त्यामुळेही अनेक भागांना कमी दाबाने पाणी मिळत होते. नवीन टाकी सुरू केल्यानंतर त्या भरून घेऊन त्यातून पाणी देण्यात येणार आहे. त्याद्वारे योग्य दाबाने सर्व भागांना पाणी मिळेल, असा विश्‍वास जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com