संभाजीराजेंचा अपमान  करणाऱ्यांना आता गादीच्या मानाचा पुळका का?

संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्यांना आता गादीच्या मानाचा पुळका का?

...आता गादीच्या मानाचा पुळका का?

उद्योगमंत्री उदय सामंत; ‘मविआ’च्या नेत्यांची दुटप्पी भूमिका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २ ः राज्यसभा उमेदवारीवेळी ज्यांनी छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केला, त्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता लोकसभेच्या निवडणुकीत गादीच्या मानाचा पुळका का आला आहे. त्यांनी संभाजीराजेंना उमेदवारी का डावलली याचा खुलासा करावा. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांच्या अशा दुटप्पी भुमिकेची कोल्हापूरकरांनी दखल घ्यावी आणि मतदानात प्रतिबिंब दाखवावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले.
शिवसेनापुरस्कृत अपक्ष उमेदवारी द्यायची आहे याबाबत चर्चा झाली. त्यानंतर ड्राफ्ट तयार झाला असे सांगणारा माजी खासदार संभाजीराजे यांचा आणि मावळे असतात म्हणून राजे असतात असा उल्लेख करत संजय पवार यांच्या उमेदवारीबाबत वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय राऊत यांचा व्हिडिओ श्री. सामंत यांनी पत्रकार परिषदेत दाखविला.
श्री. सामंत म्हणाले, ‘‘त्यावेळी पक्षप्रमुखांनी सांगितल्यानुसार ड्राफ्ट स्वतः लिहिला. तो पूर्ण झाल्यानंतर मी, खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांनी संभाजीराजेंसमवेत चर्चा केली. असा ड्राफ्ट घेणे योग्य नसल्याचे मी वरिष्ठांना चारवेळा सांगितले. त्यावर आपण उमेदवारी देतोय, तर मी त्यांना लिहून द्यायला काय हरकत आहे असा उलट प्रश्न वरिष्ठांनी केला. संजय पवार यांच्या उमेदवारीबाबत मला सांगितले नव्हते. पवार यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मी संभाजीराजेंची माफी मागितली. माझ्यासारख्या व्यक्तीची तुम्ही ज्या पद्धतीने अवहेलना करताय ती योग्य नाही. मला अपक्ष उमेदवारी द्यायची तर आता तुम्ही आमच्याकडे यावे असे सांगुन संभाजीराजे माझ्या शासकीय निवासस्थानातून निघून गेल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शरद कणसे, ललित गांधी, उदय सावंत, योगेश जानकर उपस्थित होते.
........
असे होते ‘ड्राफ्ट’मधील मुद्दे
राज्यसभा खासदारकी छत्रपती संभाजीराजे यांना मिळेल त्यावेळी ते शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायतीपासून खासदारकी निवडणुकीपर्यंत शिवसेनेचा प्रचार करतील. पक्षादेश त्यांना बंधनकारक असेल. पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख हेच आमचे नेते आहेत हे मान्य केले पाहिजे, असे मुद्दे ड्राफ्टमध्ये होते, असे सामंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com