महाविकास आघाडी सभा इतर भाषणे

महाविकास आघाडी सभा इतर भाषणे

भाजप चारशे पार नव्हे, तडीपार...तडीपार...
गांधी मैदान येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत नेत्यांचा नारा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती, शेतकरी, शिक्षण, नोकरी, उद्योगासाठी काहीही दिले नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांना मानाची पदे दिली. त्यामुळे भाजप आता चारशे पार नव्हे तर तडीपार...तडीपार असा नारा महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमदेवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत नेत्यांनी दिला.

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या रूपाने कोल्हापूरच्या मातीची अस्मिता दिल्लीत पाठवण्याची संधी आहे. राजर्षी शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार संसदेत पोहचणार आहे. २०२४ ची निवडणूक कोल्हापूरची अस्मिता जपणारी निवडणूक आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मतदान करण्याची संधी आपल्याला मिळत आहे.
‘आप’चे खासदार संजय सिंह म्हणाले, ‘देशभरातील विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबले जात आहे. आपण स्वत: सहा महिने तुरुंगात होतो. पण आम्ही ताणाशहा विरोधात बोलण्यास घाबरणार नाही. सर्व विरोधी पक्ष नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे त्यांचा मनसुबा आहे. मोदी सरकार पक्ष चोरणारे आहे. मोदी चारसौ पार म्हणतात पण जनता भाजप तडीपार-तडीपार म्हणत आहे.’

आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली त्याचवेळी महाविकास आघाडीचा विजय निश्चित झाला. भाजपच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र नासवला आहे. भाजपचे नेते पक्ष पळवू शकतात, आमदार पळवू शकतात, त्या जोरावर तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हाल. मात्र, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे होऊ शकणार नाहीत.’

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘मणिपूरसह कुस्तीपंटूनवर अत्याचार झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसले आहेत. ईडीच्या धाक दाखवून मोदी विरोधी मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. दहशत, दबाव टाकून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून लोकशाहीच्या गप्पा मारल्या जात आहेत.’

रमेश चेन्नीथला म्हणाले, ‘देशभरात मोदी विरोधाची लाट आहे. दक्षिण भारत नवा देश होणार असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. कोणीही मागणी केली नसताना ते पंतप्रधान मोदी स्वप्नात बोलत आहेत. पंतप्रधान मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशात परिवर्तनाची लाट आहे.’

माजी खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘चारशे पार म्हणजे धोक्याची घंटा आहे. एकहाती सत्ता घेण्यासाठी त्यांना पुरेसे खासदार असू शकतील. पण, ते तसे ते म्हणत नाही, यासाठी चारशे पार करून त्यांना कायदा आणि संविधान बदलायचा आहे. सध्या चंदगडमधून एक जण आपल्यावर टीका करत आहे. आम्हाला टीका केल्यावर फरक पडत नाही. याशिवाय संभाजीराजे यांनी काय केलं म्हणतात, त्यांनी पंच्चाहत्तर वर्ष काय केले, हे पहिले सांगावे. आम्ही सध्या टीकेला उत्तर देणार नाही. मात्र, सात तारखेनंतर निश्‍चितपणे उत्तर दिले जाईल. मराठा आरक्षण आणि रायगड संवर्धनाबाबत जर बोलाल तर आमच्याशी गाठ आहे.’

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी एक तक्रार केली. त्यामुळे जिल्ह्यातील ४३ हजार शेतकरी कर्जमाफीला मुकले आहेत. लातूर येथे भूकंप झाला त्यावेळी शाहू महाराज यांनी स्वत: ट्रकभर धान्य पाठवले होते. पूरग्रस्तांना आधार देण्याचे कामही त्यांनी केले आहे.’
मोदींच्या परिवारात अदानी, अंबानी, ईडी, आयकर विभाग येवढेच छोटे कुटुंब आहे. या परिवारात शेतकरी, गरीब, जवान, महिला, युवा हे कोणीही नाहीत. त्यांना त्यांची जागा दाखवून दिले पाहिजे, अशी टीका नंदाताई बाभूळकर यांनी केले.

यावेळी शिवाजी परुळेकर, दिलीप पवार, अतुल दिघे, प्रा. उदय नारकर, यशवंत गोसावी, बाबासाहेब देवकर, आर. के. पोवार, सुनील शिंत्रे, अमर चव्हाण, अंबरिश घाटगे, विजय देवणे यांची भाषणे झाली.

चौकट
संजय पवार झाले भावुक
संजय पवार यांचे भाषण सुरू असताना त्यांना मध्ये आवरत घेण्यास सांगितले. यामुळे पवार नाराज झाले. यावर तर निवेदकाने पुन्हा त्यांना बोलण्‍याची विनंती केली. यावर गद्दारांना गाडा असे आवाहन करताना पवार भावुक झाले. कोल्हापुरात खासदार झालेल्या दोन्ही गद्दारांना निवडून आणण्यासाठी आम्ही शिवसैनिकांनी जीवाचे रान केले. मात्र, त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता गद्दारांना, खोकेबहाद्दरांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका पवार यांनी केली.

चौकट
भाजपचे काम खंडणी गोळा करण्याचे
इलेक्ट्रॉल बॉण्ड म्हणजे ईडीसह इतर शासकीय यंत्रणेच्या भीती घालून भ्रष्टाचार करण्याचा नवा पायंडा भाजपने पाडला आहे. याच यंत्रणेची भीती दाखवून भाजप खंडणी गोळा करण्याचे काम करत असल्याची टीका आमदार जयंत पाटील यांनी केली.

चौकट
महात्मा गांधीही ‘हे राम’ म्हणाले होते
आम्हालाही देव धर्म आहे. पण, त्यांचा कधीही प्रचारासाठी वापर केला नाही. महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी त्यांचे शेवटचे शब्द ‘हे राम’ असे होते. पण, त्याचे कधीही मार्केटिंग केले नाही, असे स्वाती कोरी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com