पथक पोहचतेय मतदारांच्या घरी

पथक पोहचतेय मतदारांच्या घरी

gad210.jpg
81129
चंदगड : तालुक्यातील वृद्ध महिला मतदाराने मतदानानंतर मतपत्रिका मतपेटीत टाकली.
----------------------------------------------------
पथक पोहोचतेय मतदारांच्या घरी
घरातून मतदान : ‘चंदगड’मध्ये ७०० वृद्ध-दिव्यांग मतदार, २५ पथक कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : मतदान केंद्रापर्यंत येऊ न शकणाऱ्या मतदारांचे मतदान घरातच घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने यंदा दिली आहे. त्यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघातील ७०० वृद्ध व दिव्यांग मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी विशेष पथके घरापर्यंत जात आहेत. दोन दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंतच्या इतिहासात हा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे.
सहायक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार राजेश चव्हाण, ऋषिकेत शेळके यांच्या नियंत्रणाखाली ही कार्यवाही सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरलेली पाहायला मिळाली आहे. यावेळच्या निवडणुकीत तसे होऊ न देता मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने हा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. खास करून ८५ वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठीच घरातून मतदान करण्याची सुविधा या उपक्रमाद्वारे उपलब्ध केली आहे.
ग्रामपंचायत, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आदीसाठी ज्या ईर्ष्‍येने मतदान होते, तसे लोकसभा निवडणुकीत घडत नाही. यामुळे वृद्ध व दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे प्रयत्नही तसे कमीच असतात. यामुळे असे घटक मतदानापासून वंचित राहू नयेत आणि मतदानाची टक्केवारीही वाढावी हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. चंदगड विधानसभा मतदारसंघात या कार्यवाहीसाठी २५ पथकांची नेमणूक केली आहे. एका पथकात सात असे पावणेदोनशे कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक पथकात एक पोलिस कर्मचारी आहे. मतदारसंघातील ८५ वर्षांवरील ५७१ आणि दिव्यांग १२९ मतदार आहेत. ज्यांना केंद्रापर्यंत येता येत नाही. अशा मतदारांची गावनिहाय यादी तयार केली असून, मतदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. मतदानासाठी मतपत्रिकेचा अवलंब केला आहे. शिक्क्याऐवजी मतपत्रिकेवरील उमेदवार व त्यांच्या चिन्हासमोर ‘बरोबर खूण’ करावयाची आहे. वृद्ध, दिव्यांग मतदाराच्या घरी जाऊन मतदान नोंदवून घेतले जात असून, या सर्व प्रक्रियेची व्‍हिडिओ शुटिंगही करण्यात येत आहे. घरातून मतदान प्रक्रियेचे समन्वयक म्हणून चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण काम पाहत आहेत.
----------------
टक्का वाढवण्यासाठी
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे गावागावांत प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून मतदार जागृती फेरी काढली जात आहे. काही ठिकाणी पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्‍व पटवून दिले जात आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याबाबत व्याख्यानांसह भित्तिपत्रके, फलक लावले आहेत. काही ठिकाणी सेल्फी पॉईंटही तयार केले आहेत. ''मतदान टक्का वाढविण्यासाठी काय पण'' असे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com