अंगणवाडी सेविका, आशा उपाशीच

अंगणवाडी सेविका, आशा उपाशीच

अंगणवाडी सेविकांचा निवडणूक भत्ता प्रलंबित
मतदार जनजागृतीसह मतदानदिवशी सांभाळली जबाबदारी; प्रशासनाने द्यावे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत झालेले मतदान हे तिसऱ्या टप्प्यातील सर्वाधिक मतदान ठरले. मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी कोल्हापुरात प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले. गावागावांतील अंगणवाडी सेविकांना प्रबोधनाचे काम दिले. रणरणत्या उन्हातही अंगणवाडी सेविकांनी प्रबोधनाची मोहीम राबविली. मात्र, सुटीच्या काळात केलेल्या कामाचा कोणताही मोबदला त्यांना प्रशासनाने दिलेला नाही, याबाबत नाराजीचा सूर अंगणवाडी सेविकांकडून व्यक्त होत आहे.
मतदान हे लोकशाहीत आद्यकर्तव्य मानले जाते. ते स्वयंस्‍फूर्तीने व्हावे, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. याचाच भाग म्हणून यंदाच्या निवडणुकीत अंगणवाडी सेविकांना घराघरांत जाऊन मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्याचे काम दिले होते. सध्या अंगणवाड्यांना सुट्या पडल्या आहेत. अशावेळी त्यांनी मतदानाची प्रबोधन मोहीम राबवत लोकशाहीतील सर्वांत मोठ्या उत्सवात जबाबदारी पार पाडली. मात्र, प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यातही भरीस भर म्हणून मतदानादिवशी मतदान केंद्रावर पाळणाघराची जबाबदारी दिली. मातांना मतदान करता यावे, यासाठी शून्य ते पाच वर्षांतील मुलांना त्यांनी दिवसभर सांभाळले. मात्र, या काळात त्यांना उपाशीपोटी हे काम करावे लागले. काही ठिकाणी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चहा, जेवण पुरवले. मात्र, काही ठिकाणी त्या उपाशीच होत्या.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान कर्तव्यावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये भत्ता देणे अनिवार्य आहे. मात्र, या कामाचा भत्ता त्यांना मिळालेला नाही.
------
कोट
खरेतर अंगणवाडी सेविका या कुपोषणमुक्तीसाठी व बालकांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे काम करतात. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना इतर कोणत्याही विभागाचे काम लावण्यास मनाई केली आहे. तरही शासनाकडून त्यांना विविध कामांची जबाबदारी दिली जाते. मंगळवारी (ता. ७) झालेल्या मतदानादिवशीचा भत्ता अजुनपर्यंत मिळालेला नाही. त्याआधी प्रबोधन मोहिमेविषयी तर कोणी बोलतच नाही.
- सुवर्णा तळेकर
-----
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
अंगणवाडी सेविकांना मतदान केंद्रावर ड्युटी लावली होती. यावेळी त्यांना उपाशीपोटी काम करावे लागले. अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी मतदान केंद्र प्रमुखांकडे हजेरी भत्ता व दैनिक भत्ता मिळावा, यासाठी अर्ज भरण्याची मागणी केली. त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भत्त्‍यासाठी कार्यालयाने कोणतीही रक्कम दिलेली नाही, असे केंद्र प्रमुखांकडून सांगण्यात आले. हा भत्ता त्वरित मिळावा, अशा आशयाचे पत्र कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले आहे.
-----
आशा स्वयंसेविकांनाही नाही भत्ता
उन्हाचा वाढता प्रभाव असल्याने सर्वच मतदान केंद्रांवर आशा स्वयंसेविकांकडून प्रथमोपचाराची व्यवस्था केली होती. त्यासाठी त्यांना निवडणूक भत्ताही मंजूर आहे. हा भत्ता केंद्रप्रमुखांकडे दिला होता. काही ठिकाणी आशा स्वयंसेविकांना हा भत्ता मिळाला आहे, तर काही ठिकाणी दिलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com