जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळांमधील
स्वच्छतागृहांची दुरवस्था

प्राथमिक शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : शाळा व्यवस्थापन समित्या नावापुरत्याच
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : गोरगरीब, सर्वसामान्य विद्यार्थांचे शिक्षण मंदिर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या स्वच्छतागृहांची दुर्दशा झाली आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या स्वच्छतागृहांमध्ये जायचे म्हणजे आजार ओढवून घेतल्याचा प्रकार आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.
‘स्वच्छतेतून समृध्दीकडे’ असा नारा देत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधण्यात आली. विद्यार्थांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे, त्यांनी या स्वच्छतागृहांचा वापर करावा, हा देखील उद्देश यामागे होता. जिल्ह्यात २०९९ प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये एक लाख ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय आठ हजार ९१ शिक्षक कार्यरत आहेत. या सर्वांसाठी शाळांमध्ये स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने स्वच्छतागृहांची बांधणीही झाली. सुरुवातीला या स्वच्छतागृहांची स्वच्छता ग्रामपंचायतींकडून राखली गेली. आता याच स्वच्छतागृहांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे; तर अनेक शाळांमध्ये काही दिवसांपूर्वी बांधलेल्या स्वच्छतागृहांची मोडतोड झाल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या निधीतून मोठ्या प्रमाणात खर्च करूनही याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने शाळांच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे.
जिल्ह्यातील ज्या-ज्या शाळांमधील स्वच्छतागृहांची कामे झाली आहेत, ती कामेही म्हणावी तशी दर्जेदार झालेली दिसत नाहीत. स्थानिक पातळीवर लोकांनी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शाळा व्यवस्थापन समित्या केवळ नावापुरत्याच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील २०९९ शाळांमध्ये स्वच्छतागृह असल्याची सांख्यिकी विभागाकडे नोंद आहे. आणखी काही नवीन स्वच्छतागृहे बांधावी लागणार आहेत. त्याआधी जुन्या स्वच्छतागृहांची दुरवस्था पाहून दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यांची स्वच्छता ठेवणेही गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांसाठी केवळ निधी खर्च झाला आहे. त्याचा वापर मात्र होताना दिसत नाही.
...

‘जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील स्वच्छतागृहांचीच स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी मोडतोड झाली आहे. याकडे ग्रामपंचायतींकडून लक्ष दिले जात नाही.
दशरथ कदम, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com