इचलकरंजी महापालिकेकडे नाही टँकर

इचलकरंजी महापालिकेकडे नाही टँकर

इचलकरंजी महापालिकेकडे नाही टँकर
अक्षय तृतीयेदिवशीच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती ः कूपनलिका कोरड्या
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : शहरात मागील काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे अनेक भागांत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. परिणामी अक्षय तृतीयेदिवशी नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागले. सुमारे ५०० कोटी वार्षिक बजेट असलेल्या इचलकरंजी महापालिकेकडे पाणी वितरणासाठी टँकर नसल्याची स्थिती आहे. नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होते.
शहरास कृष्णा आणि पंचगंगा या दोन नदीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, कृष्णा योजनेच्या जलवाहिनेला वारंवार गळतीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे येथील जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. परिणामी येथून होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असतो. दुसरीकडे पंचगंगा नदीतील खालवणारी पाण्याची पातळी व दूषित पाणी यामुळे या योजनेचा पाणी उपसा बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येत असते. त्यामुळे इचलकरंजीवासीयांना पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावत असतो. महापालिका प्रशासन मात्र वेळकाढू भूमिका स्वीकारताना दिसून येते.
इचलकरंजी महापालिकेच्या ताफ्यात अनेक अत्याधुनिक व महागड्या वाहनांचा समावेश आहे. मात्र, नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची सुविधा नाही. शहरात होणारे विविध कार्यक्रम, तसेच पाणीपुरवठा होत नसलेल्या भागात पाण्यासाठी महापालिकेस अग्निशमन वाहन पाठवावे लागते. अशावेळी आगीची दुर्घटना घडल्यास तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरात कामगार वस्ती अधिक असल्याने त्यांच्याकडे पाणी साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे नागरिकांना आठ दिवस पुरेल इतके पाणी साठवणे शक्य होत नाही. अशावेळी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास पाण्यासाठी भटकावे लागते. त्यामुळे ज्या भागात पाणीपुरवठा वेळेत होत नाही, अशा ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र टँकर असणे आवश्यक आहे.
---------------------------------
पाणीपट्टी वर्षाची, पुरवठा मात्र सहा महिन्यांचा
महापालिका प्रशासन नागरिकांकडून वर्षापोटी एक हजार ८०० रुपये पाणीपट्टी वसूल करते. मात्र, शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा मात्र सहा महिनेच करीत असल्याचा आरोप वारंवार नागरिकांमधून होत आहे. त्यातून महापलिकेच्या दारात वारंवार विविध प्रकारची आंदोलने होत असतात.
------------------------
१४० कूपनलिका कोरड्या
पाणी टंचाईवेळी कूपनलिका आधार ठरत आहेत; पण गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे शहरातील भूजल पातळी खालावत जात असल्याचे समोर येत आहे. त्याचे परिणाम आता दिसून येत असून आतापर्यंत शहरातील १४० कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गेल्या वर्षी एप्रिलअखेर ८० कूपनलिका बंद पडल्या होत्या. तुलनेने यंदा प्रमाण खूपच जास्त असल्याचे समोर येत आहे.
-------------------------
महापालिका अवजड वाहन दृष्टिक्षेप
अग्निशमन वाहन - २*
मैला सक्षन वाहन - १*
शववाहिका - २*
रुग्णवाहिका -१*
रिफ्यूज कॉम्पॅक्ट -२*
----------------
महापालिका प्रशासनाकडून पाच हजार लिटर क्षमता असलेल्या टँकरबाबत प्रस्ताव पाठवला आहे. त्याचा वापर आवश्यक ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी होणार आहे.
- सुभाष देशपांडे, जलअभियंता, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com