बसवेश्‍वर जयंतीनिमित्त मिरवणुकीतून प्रबोधनपर संदेश

बसवेश्‍वर जयंतीनिमित्त मिरवणुकीतून प्रबोधनपर संदेश

लोगो
बसवेश्‍वर जयंती
--
फोटो 82885
-
आवाहन... पाणी अन् लेक वाचविण्याचे!
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज यांचा अखंड जयघोष, बँड, झांज पथक, धनगरी ढोलाचा गजर, लेझीम पथकाचे कलाविष्कार, फुलांनी सजवलेली पालखी, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवरायांचे लक्षवेधी पुतळे, मोरपंखी रंगाच्या साड्या, गुलाबी रंगाचे तुर्रेदार फेटे परिधान केलेल्या महिलांचा अमाप उत्साह असे मंगलमय वातावरण शुक्रवारी सायंकाळी पहायला मिळाले.
निमित्त होते, बसवेश्‍वर जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे. पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा, लेक वाचवा, रक्तदान हेच श्रेष्ठदान असे समाज प्रबोधनपर संदेश देत निघालेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले.
वीरशैव लिंगायत समाजातर्फे परंपरेनुसार दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे शिव-बसव जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. सायंकाळी मठातून भव्य शोभा यात्रेला प्रमुख पाहुण्या वीणा बाळसाहेब साव्यानावर यांच्या हस्ते शिव-बसव पालखीचे पूजन होऊन सुरुवात झाली. शोभायात्रेत पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा, रक्तदान हेच श्रेष्ठ दान, लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा, अशा आशयांचे विविध लक्षवेधी फलक व चित्ररथाचा समावेश होता. पारंपरिक वेशात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, महापालिका, गवळी गल्ली, तेली गल्ली, बुरुड गल्ली, नष्टे गल्ली मार्गे ही मिरवणूक सीपीआर चौकातून पुन्हा चित्रदुर्ग मठात येऊन शोभायात्रेची सांगता झाली.
दरम्यान, वीरशैव लिंगायत समाजातील व्यक्तींकडून मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पालखीच स्वागत आणि पूजन करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष किरण सांगवडेकर, सुनील गाताडे, ॲड. सतीश खोतलांडे, चंद्रकांत स्वामी, राजू वाली, सुहास भेंडे, संजय बोधले, डॉ. गिरीष कोरे, राजेश पाटील-चंदूरकर, अमित झगडे, नाना नष्टे, श्रीकांत बनसोडे, गुरुदेव स्वामी, चंद्रकांत हळदे, अमित झगडे, किरण व्हनगुत्ते, राजेंद्र करंबळी, उमा बनसोडे, राजेश पाटील, सुजाता विभुते, संगीता करंबळी, सुनंदा नष्टे, मीना सावर्डेकर, सुलोचना हिरेमठ, उमा गाताडे, सुनीता शेटे, साधना पाटील, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रा झाल्यानंतर समाजबांधवांना प्रसाद वाटप करण्यात आला.

चौकट
चित्रदुर्ग मठात दिवसभर विविध कार्यक्रम
बसवेश्‍वर जयंतीनिमित्त सकाळी चित्रदुर्ग मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दुपारी बारा वाजता बसवेश्‍वरांचा जन्मोत्सव झाला. आमदार विनय कोरे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यानंतर धार्मिक विधी होऊन प्राची व प्रमोद लंबे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी अक्कमहादेवी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. यानंतर सुभाष महाजन यांचे बसवेश्‍वर व लिंगायत धर्म या विषयावर व्याख्यान झाले. रात्री नऊ वाजता संगीत रजनी हा भावगीते व भक्तीगीतांचा कार्यक्रमांनी झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com