शुटींगसाठी एक खिडकी योजना

शुटींगसाठी एक खिडकी योजना

फोटो 83064

शूटिंगसाठीची ‘एक खिडकी’ गायबच!
प्रभावी अंमलबजावणीची मागणी; परवाने मिळवण्यासाठी मारावे लागतात हेलपाटे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः राज्य सरकारने चित्रपट, मालिका, जाहिरातपट, माहितीपटांच्या शूटिंगसाठी आवश्‍यक परवानगीसाठी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित केली; पण त्याला वर्ष उलटले तरी अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शहरातील विविध लोकेशन्सची माहिती संबंधित विभागाने घेतली आहे. मात्र, वर्षभरात परवानगीसाठी महापालिकेच्या यंत्रणेकडे एकही अर्ज आलेला नाही. दरम्यान, शूटिंगसाठी आवश्यक परवान्यासाठी अजूनही हेलपाटे मारावे लागत आहेत.

मराठी, हिंदी चित्रपटांसह विविध भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, माहितीपट, लघुपट, जाहिरातपटांचे शासकीय व निमशासकीय यंत्रणांच्या अखत्यारीत असणाऱ्या चित्रीकरणस्थळांवर चित्रीकरण करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी विविध विभागांकडे जाऊन परवानगी मिळण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ निर्मिती संस्थांवर येते. वेळ आणि पैसा अशा दोन्ही पातळीवरील हा त्रास कमी करण्यासाठी राज्य सरकारने मे २०१८ मध्ये ‘एक खिडकी योजना’ मुंबई व उपनगरातील शासकीय व निमशासकीय यंत्रणांकडे येणाऱ्या चित्रीकरण स्थळांसाठी लागू केली. त्यानंतर ४ मार्च २०२२ रोजी राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी ती कार्यान्वित केली. महाराष्ट्र फिल्म, स्टेज ॲंड कल्चरल डेव्हलपमेंट (एमएफएससीडीसी) कॉर्पोरेशनच्या माध्यमातून राज्यभरात ही यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले; पण त्यानंतरही माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया कासवाच्या गतीने सुरू राहिली. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर महापालिकेने वर्षापूर्वी योजनेसाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आवश्यक यंत्रणा उभी केली आणि तेथील व्यवस्थापकांवर समन्वयाची जबाबदारी दिली. या यंत्रणेने शहरातील विविध लोकेशन्स, त्याचे अंदाजे भाडे, परवानगी देणारे संबंधित विभागप्रमुख अशी सर्व आवश्यक माहिती मुंबईतील सनियंत्रण यंत्रणेला पुरवली असली तरी पुढे कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

कोट
राज्यभरात कुठेही चित्रीकरण करायचे असले, तरीही सर्व परवानग्या या योजनेतून मिळतील, अशी व्यवस्था आहे. सुरुवातीच्या काळात ही सुविधा ऑनलाईन सुरू झाली असून, ती सध्या फक्त मुंबई आणि परिसरापुरतीच मर्यादित आहे. मात्र, राज्यातील इतर ठिकाणी तशी कोणतीच व्यवस्था नाही. तत्काळ याबाबत योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
- मिलिंद अष्टेकर, निर्मिती व्यवस्थापक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com