बिन्स, ढब्बू, हिरवी मिरची कडाडली

बिन्स, ढब्बू, हिरवी मिरची कडाडली

83102
गडहिंग्लज : वळीव पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मिरची बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने विक्रेत्यांना प्रतीक्षेत थांबावे लागले. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)


बिन्स, ढब्बू, हिरवी मिरची कडाडली
स्थानिक आंबे दाखल; पालेभाज्या, कोथिंबीरीचे वाढलेले दर कायम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : लग्नसराई, वास्तुशांत समारंभामुळे बिन्स, ढब्बू, हिरवी मिरचीचे मागणीमुळे दर कडाडले आहेत. पालेभाज्या, कोथिंबीरीचे वाढलेले दर कायम आहेत. फळबाजारात स्थानिक आंबे दाखल झाल्याने कोकणातील हापूसचे दर कमी झाले. कांदा, बटाट्याचे भाव स्थिर आहेत. अंड्याचे दर शेकडामागे दीडशे रुपयांनी वधारले. जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेंढ्याची आवक कमी झाली आहे.
लग्न आणि वास्तुशांतचे मुहूर्तामुळे गेल्या पंधरवडयात बिन्स, ढब्बू, हिरवी मिरचीला मागणी अधिक वाढली. मुळातच वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्या, फळभाज्यांच्या वाढीवर मोठा परिणाम झाल्याने आवक कमी आहे. यामुळेच दर कडाडले आहेत. खासकरून बिन्सच्या १० किलोचा दराने हजारचा ठप्पा गाठला. किरकोळ बाजारात तीस रुपये पाव किलो अशी विक्री सुरू होती. ढब्बू, हिरवी मिरचीच्या दराची ‘सेंच्युरी’ कायम आहे. प्लॉवरचा दरदेखील वाढला आहे. मेथी, पालक, कोथिंबीरीच्या पेंढीचा दर २० रुपये आहे. भाजी मंडईत केवळ कोबी, टोमॅटो, वांग्याचे असणारे कमी दर ग्राहकांना दिलासा देणारे ठरत आहेत.
कांदा १५ ते २५, तर बटाटा २५ ते ४० रुपये किलो असा दर स्थिर आहे. लसूण १४० ते २२५ रुपये किलो असा दर्जानुसार दर आहे. फळबाजारात स्थानिक आंबे आल्याने कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याचे दर उतरले. कोकण हापूस ३०० ते ५०० तर पायरी २५० रुपये ३५० रुपये डझन असा दर होता. कर्नाटकी आंबा २०० ते ३०० रुपये डझन आहे. चंदगड, आजरा परिसरातून फणसाची आवक वाढली असून, आकारानुसार १०० ते २०० रुपयापर्यंत दर आहेत. जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेढ्यांची आवक कमी होती. सुमारे पन्नासहून कमी आवक होऊन १० ते १५ हजारांपर्यंत दर होते. म्हशींची जेमतेम चाळीस आवक होऊन ४५ ते नव्वद हजारांपर्यंत दर होते. फळभाज्या महागल्यामुळे अंड्यांना मागणी आहे. त्यामुळेच शेकड्याला दीडशेहून अधिक दर वाढले. अंड्याचा शेकडा ५९५ रुपये असा दर होता.
-----------------
चौकट..
मिरची खरेदीला ब्रेक
घरगुती वापरासाठी वाळलेली मिरची उन्हाळ्यात खरेदी केली जाते. पुढील महिन्यापासून पाऊस सुरू होणार असल्याने मिरची खरेदी अंतिम टप्यात आहे. पण, काल झालेला वळीव पाऊस आणि सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे खरेदीकडे आज ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसले. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. मिरची वाळवण्यातील अडचणींमुळे जेमतेम खरेदी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मिरचीचे ब्याडगी ३५० ते ५०० तर जवारी (संकेश्‍वरी) ६०० ते ९०० रुपयापर्यंत किलोचे दर होते.
-----------------
बाजार दृष्टिक्षेपात
- कलिंगडाची आवक घटली
- पालक, मेथी तेजीतच
- फणसाची आवक वाढली
- मासे दर वाढले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com