पार्किंगचा घोळ

पार्किंगचा घोळ

फोटो- 83191, 83195, 83196
--
लोगो ः ग्राउंड रिपोर्ट
--

पार्किंगचा बट्याबोळ, पर्यटकांचा गोंधळ
ठिकठिकाणी फिरून मिळेना जागा; व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा मात्र रिकामी

कोल्हापूर, ता. १२ ः करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना उन्हाचा तडाखा व वाहतुकीच्या कोंडीतून ठिकठिकाणच्या पार्किंगचा शोध घेता-घेता नाकीनऊ येत आहे. एक ठिकाण फुल्ल झाल्याने दुसरे ठिकाण सांगितले जाते. दुसऱ्या ठिकाणीही तीच स्थिती असल्याने तिसऱ्या ठिकाणाच्या दिशेने पाठवले जाते. यामुळे पर्यटकांची गाडी परिसरातच दोन-दोन तास फिरते. शहरातील पार्किंगच्या नियोजनाचा बट्याबोळ झाल्याने पर्यटकांचा मात्र हिरमोड होत आहे.
सुटीच्या कालावधीत पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून विविध ठिकाणे पार्किंगसाठी निवडली आहेत; पण त्यानंतरही अनेक ठिकाणी रस्त्यावरच वाहने असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. भरदुपारी या प्रकाराचा शोध घेतल्यानंतर त्याचे मूळ नियोजनात जाणवले. त्यासाठी सोलापूरहून आलेल्या एका कुटुंबाच्या वाहनाची अवस्था पाहिली. व्हिनस कॉर्नरकडून मंदिराच्या दिशेने जाताना गाडी अड्ड्यातील पार्किंगची जागा रिकामी असूनही वाहने आत जात नसल्याने ते अंबाबाई मंदिराकडे असे फलक पहात बिंदू चौकात आले. तिथे शहर वाहतूक शाखेचा पोलिस भवानी मंडपाचा रस्ता दाखवत होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भाऊसिंगजी रोडवरून भवानी मंडपापर्यंत वाहन आल्यानंतर पार्किंग करण्यासाठी पुन्हा त्यातील छोट्या गल्लीतून बिंदू चौकात यावे लागले. तिथे जागा फुल्ल झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसाकडे विचारणा केल्यानंतर शिवाजी स्टेडियमकडे जा, असे सांगत मार्ग दाखवला.
तिथून वाट काढत कॉमर्स कॉलेजमार्गे शिवाजी स्टेडियमजवळ पोहचले. तिथे वाहनांची मोठी गर्दी. पूर्वीच्या वाहनांच्या पाठीमागे दुसरी वाहने लावल्याने अनेकजण अडकून पडले होते. त्यामुळे जागा रिकामी होत नसल्याने शाहू स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने उभी होती. सोलापूरकरांच्या त्या वाहनाला जागा मिळेना. शेवटी त्यातील ऋतुजा वकील या महिला उतरल्या व स्टेडियमच्या आसपास रिकामी जागा शोधण्यास उन्हात फिरू लागल्या. एका ठिकाणची गाडी काढली जाणार असल्याचे समजताच ती गाडी निघण्याची वाट पहात उभ्या राहिल्या. दुपारी बारापासून दीड वाजेपर्यंत त्या वाहनासाठी जागा शोधत होत्या. त्या म्हणाल्या, ‘वाहतूक पोलिस सांगतात आमचे पोलिस ठिकठिकाणी आहेत. पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेल्यानंतर पार्किंग फुल्ल असल्याचे समजते. तिथून कुठे जायचे हे सांगणारे कुणी नाही. शिवाजी स्टेडियमजवळ शिस्त लावण्यासाठी किमान एक पोलिस हवा. पर्यटकांची प्रचंड दमछाक होत आहे. काहीतरी व्यवस्था करायला हवी.’’
तिथेच उभे असलेले बदलापूर (कर्जत) येथील पर्यटक संदीप सोमण यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी गाडी येण्याची वाट पाहात उभे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘काल रात्री आलो. कुटुंबाला थांबण्यासाठी लॉज मिळेना. नंतर गाडीच्या पार्किंगसाठी फिरत होतो. शेवटी चालकाला जागा शोधून तूच गाडी उभी कर. आम्ही सकाळी देवदर्शन करून फोन करतो. त्या ठिकाणी ये असे सांगितले. आता त्याला फोन करून तो गाडी घेऊन येण्याची वाट पहात आहे. पार्किंगची व्यवस्था बरोबर नाही.’ ही दमछाक एका कुटुंबाची नव्हे, तर बिंदू चौकात येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाची होत आहे.

चौकट
व्हिनस कॉर्नर गाडी अड्ड्याचा वापर
बिंदू चौकात आल्यानंतर पार्किंग फुल्ल झाल्याने परत फिरणाऱ्या वाहनधारकांना व्हिनस कॉर्नर गाडीअड्ड्याजवळच थांबवण्याची गरज आहे. तो परिसर पूर्ण रिकामा असून, जवळपास शंभर वाहने उभी राहतील. तिथे फलक लावून वाहने त्या जागेत वळवण्याची व्यवस्था केली तर बिंदू चौकात येणारी अनेक वाहने थांबतील. तिथे रिक्षा व्यावसायिकांना सांगून मंदिरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. याच प्रकारे पेटाळा मैदानासाठी नियोजन करायला हवे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्याचे नियोजन झाल्यास मध्यवस्तीतील वाहतूक कोंडी काही अंशी कमी होण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com